नाशिक – कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या निवास व्यवस्थेसाठी तपोवन परिसरातील १८०० झाडे तोडण्यावरून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि मनसेच्यां स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. साधुग्राम उभारणीसाठी काही झाडे काढावी लागतील.

मनसेने यात राजकारण करू नये. तपोवनमधील जागा मोकळी न केल्यास साधुग्राम कुठे करावे, हे सांगावे, असे आव्हान कुंभमेळामंत्री महाजन यांनी मनसेला दिले. यावर मनसेने आपल्या कार्यकाळात म्हणजे मागील कुंभमेळ्यात एकही झाड तोडावे लागले नसल्याचा दाखला देत साधू-महंतांच्या निवास व्यवस्थेसाठी अनेक पर्याय सुचवत प्रत्युत्तर दिले आहे.

कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या-साधू महंतांसाठी तपोवन परिसरात साधूग्रामची उभारणी केली जाते. ५४ एकरचा परिसर मोकळा करण्यासाठी महानगरपालिकेने १८०० हून अधिक झाडे चिन्हांकीत करीत नोटीस देऊन हरकती व सूचना मागविल्या. शासन व प्रशासनाकडून हरित कुंभ असे विपणन होत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याची कृती त्या विपरित असल्याची टीका होत आहे. पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी वृक्षतोडीला विरोध करीत हरकतींचा वर्षाव केला. तपोवनमध्ये चिपको आंदोलन केले.

गुरुवारी मनसेने तपोवनात आंदोलनाद्वारे वृक्षतोडीचा निषेध केला. शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष सलिम मामा शेख यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसेच्या शिष्टमंडळाने नंतर मनपा आयुक्त मनिषा खत्री यांना निवेदन दिले. १८०० झाडे तोडल्यामुळे शहराचे मोठे नुकसान होणार असल्याकडे लक्ष वेधले.

वृक्षतोडीवरून निर्माण झालेला रोष लक्षात घेत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनला भेट देऊन पर्यावरणप्रेमींशी चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या मनसेला याकडे राजकारण म्हणून पाहू नका, असा सल्ला दिला.

आगामी सिंहस्थात मोठी गर्दी होईल. शेकडो वर्षांपासून तपोवनमध्ये साधू महंतांची निवास व्यवस्था असते. त्यासाठी परिसराची साफसफाई करावी लागणार आहे. आंदोलन करणाऱ्या मनसेने कुंभमेळा कुठे करावा, साधुग्राम कुठे करावा हे सांगावे. साधू-महंतांची कुठे व्यवस्था करावी हे मनसेने सांगावे असे त्यांनी सूचित केले. यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

मागील कुंभमेळ्याचे आम्ही साक्षीदार मनसेच्या कार्यकाळात तपोवनमधील एकही झाड तोडावे लागले नाही. परिसरात झाडांमध्ये १० ते १५ फूट अंतर आहे. मोकळ्या जागेत तंबू उभारता येतील. साधूग्रामसाठी इतका खर्च करण्याची आवश्यकता नाही. शहरात शेकडो लॉन्स, सभागृह, मंगल कार्यालये असून ती भाडेतत्वावर घेता येतील. कुंभमेळा काळात तिथे फारसे कार्यक्रम नसतात. ती भाडेतत्वावर घेतल्यास शासनाचा पैसा वाचू शकतो, याकडे सलीम शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. नाशिककरांनी अनेक कुंभमेळा बघितले आहेत. त्यांना नियोजनात सामावून घ्यावे, असे आवाहन आंदोलकांनी केले.