नाशिक – नाशिकमधील गुन्हेगारी वेगवेगळ्या प्रकारचे वळण घेत आहे. लुटमार, खंडणी, घरांवर दगडफेक असे प्रकार नित्याचे झाले असताना आता भूखंड हडपण्याचे प्रकार घडू लागले आहेत. विशेष म्हणजे, यात सरळ मार्गाने जाणाऱ्या वर्गाला अधिक त्रास होत आहे. आयुष्यभर कष्ट करुन जमविलेल्या पुंजीतून शहरात घर बांधण्यासाठी भूखंड घेणाऱ्यांनाच भूमाफियांकडून धमकी दिली जात आहे. नाशिकच्या पंचवटी भागातील असा एक प्रकार सध्या गाजत असून सर्वसामान्यांची धनदांडग्यांकडून कशी लुटमार केली जात आहे, याचे उदाहरण म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.

नाशिक शहर परिसरात मोकळी जागा असल्यास खोटी कागदपत्रे तयार करुन आणि बनावट व्यक्ती उभी करुन जमिनीचा ताबा मिळविण्याचे काही प्रकार नाशिकमध्ये याआधीही घडले आहेत. जागा मालकावर दबाव आणून, धमकी देत जागा बळकाविण्याचे प्रकार घडले आहेत. त्यापैकी काही जणांना तर जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने अशा प्रकरणांमध्ये अनेक जण भीतीने गप्प बसण्याची भूमिका घेतात. काही जण हिंमत दाखवून पोलिसांकडे जातात. पंचवटीतील धात्रक फाटा परिसरात के. के. वाघ कृषी महाविद्यालय आहे. या महाविद्यालय परिसरातील भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावून जागा मालकालाच धमकावित पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जमीन मालकाने ज्यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे, त्यांनी याआधीही अशाप्रकारे भूखंड बळकावल्याची चर्चा आहे. संबंधित जमीन मालकाला धमकी देण्यापुरतेच हे प्रकरण थांबले नसून जागा मालकाच्या मानेवर पाय ठेवून एक लाख रुपये लुटण्यात आले. तसेच, पुन्हा या जागेवर आल्यास जीवे मारण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आली. याप्रकरणी सद्दाम शेख,. लता बर्डे आणि राजाराम गटकळ (रा. दिंडोरी) यांच्याविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात श्रीकांत कुलकर्णी यांनी तक्रार दिली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीत म्हटल्यानुसार के. के. वाघ कृषी महाविद्यालयासमोर सर्व्हे क्र. २४०-०१ मधील प्लॉट २००५ मध्ये त्यांनी गोटीराम भोईर यांच्याकडून नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्राव्दारे खरेदी केला होता. २०२३ पासून या जागेवर ले- आऊटचे काम सुरु होते. एकदा कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा ले-आऊटच्या कामासाठी गेले असता बनावट कागदपत्र दाखवून त्यांना संशयितांकडून धमकाविण्यात आले. संशयित शेख आणि बर्डे यांनी जागेवर देवाची मूर्ती ठेवत अनधिकृतपणे ताबा मिळवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, त्यांनी जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी कुलकर्णी यांच्याकडे पाच कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली. कुठेही जाऊन माझे नाव विचार, तुझ्यावर खोटा ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करीन, असेही धमकाविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.