नाशिक – शहर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा फटका आता वकिलांनाही बसू लागला आहे. संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढत वकिलावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात आडगाव पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून अन्य संशयित फरार आहे. गुरूवारी संशयिताला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या आवारात सर्व वकील जमले होते.
ॲड. रामेश्वर बोराडे बुधवारी दुपारी मांडसांगवी येथील सेतु कार्यालयात असतांना दिनकर टिळे हे तेथे कामानिमित्त आले होते. बाेराडे संगणकावर काम करत असतांना पाच संशयित कार्यालयात आले. बाेराडे यांना शिवीगाळ करत कोयत्याने बोराडे आणि टिळे यांच्यावर हल्ला चढवला. हल्लानंतर संशयित दुचाकीवरून पळून गेले. जखमी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिकांनी संशयितांपैकी एकाला पकडून ठेवले. आडगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी गुरूवारी संशयित श्रृत कुलथे याला न्यायालयात हजर केले असता सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कुलथे याला न्यायालयात आणले असता मोठ्या प्रमाणावर वकिलांचा जमाव जमा झाला. हल्ल्याचा निषेध करण्यात आला. संशयिताचे आरोपपत्र कोणी घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले.