नाशिक – मागील काही वर्षांची उणीव भरुन काढत नाशिकचे युवा क्रिकेटपटू आता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही आपल्या कामगिरीची चमक दाखवू लागले आहेत. त्यांच्या कामगिरीची दखल घेणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला तसेच महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेला भाग पडत आहे. त्यामुळेच अलीकडील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र संघात निवड होणारी नाशिकच्या क्रिकेटपटूंची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, आयपीएल स्पर्धेत उतरणाऱ्या संघांचीही नजर नाशिकच्या क्रिकेटपटूंवर गेली असून यंदाच्या आयपीएलमध्ये एकाचवेळी दोन नाशिककर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यापैकी एकाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २३ वर्षांखालील सी. के. नायडू चषक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

युवा क्रिकेटपटूंना आपले कौशल्य राष्ट्रीय पातळीवर सिध्द करण्यासाठी सी. के. नायडू चषक ही महत्वपूर्ण स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र संघाचा एलिट गटात समावेश असून महाराष्ट्राचे साखळी सामने २३ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत विविध ठिकाणी होणार आहेत. महाराष्ट्राच्या संघात या स्पर्धेसाठी नाशिकचा आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखची निवड झाली आहे. याआधी ज्या, ज्या स्पर्धेसाठी निवड झाली, त्या स्पर्धा साहिलने गाजवल्या असल्याने सी. के. नायडू चषक स्पर्धेतील त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेथत्वाने आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे त्याच्याकडे नाशिककरांपेक्षा अधिक लक्ष असेल. त्यासाठी कारणही तसेच आहे.

आगामी आयपीएल स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्सने साहिल पारखची आपल्या ताफ्यात निवड केली आहे. चेन्नई सुपरकिंग्जने नाशिकच्याच रामकृष्ण घोष यास कायम ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात के. एल. राहुल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, डेव्हीड मिलर यासारख्या दर्जेदार खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर खेळणे आणि त्यांच्या खेळाचा जवळून अनुभव घेण्याची संधी साहिलला यानिमित्ताने मिळणार आहे.

साहिलने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत वरिष्ठ महाराष्ट्र संघात पदार्पण केले. १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या विनू मंकड स्पर्धेत साहिल महाराष्ट्र संघाचा कर्णधार आहे. नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा, हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता.

बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनीत (एनसीए) भारतभरातील उदयोन्मुख युवा खेळाडूंसाठी आयोजित शिबिरात साहिलची सलग तीन वर्षे निवड होत आहे. त्यानंतर आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील बीसीसीआयच्या इंटर एनसीए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी केली होती. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधार पदापाठोपाठ आता आयपीएलनंतर २३ वर्षांखालील सी. के. नायडू चषकासाठी महाराष्ट्र संघात त्याची निवड झाली आहे. एलिट गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राचे पहिले दोन साखळी सामने सोलापूर येथे होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचे २३ जानेवारी- त्रिपुरा, ३० जानेवारी -पुदुचेरी , ६ फेब्रुवारी -आंध्र प्रदेश.,१३ फेब्रुवारी -दिल्ली योंच्याविरुध्द सामने होणार आहेत. साहिलच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.