नाशिक – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कुष्ठरोग प्रसार शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘स्पर्श जनजागृती व कुसुम – कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र विशेष कुष्ठरोग शोध मोहीम २०२५–२६’ राज्यभर राबविण्यात येत असून नाशिक जिल्ह्यात ही मोहीम ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत समाजाच्या मुख्य प्रवाहापासुन दुर असलेल्या जोखीमग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
आरोग्य विभाग सातत्याने तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी यासाठी प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सेवा जलद गतीने दिल्याचा दावा होत असतांना काही आजार मात्र दुर्लक्षित होतात. आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोग प्रसार शून्यावर आणण्यासाठी स्पर्श जनजागृती व कुसुम – कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र विशेष कुष्ठरोग शोध मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश समाजात लपून राहिलेले तसेच वंचित, स्थलांतरित व जोखीमग्रस्त वसाहतींमधील कुष्ठरोग रुग्णांचा लवकरात लवकर, विना विकृती शोध घेऊन त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे हा आहे. यामुळे नवीन संसर्ग रोखून संसर्गाची साखळी खंडित करणे व कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने प्रभावी वाटचाल करणे अपेक्षित आहे.
या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील आश्रमशाळा, वस्तीगृहे, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, तात्पुरत्या वसाहती, बांधकाम कामगार, स्थलांतरित वस्ती, खदान कामगार वसाहती, जोखीमग्रस्त भाग तसेच कारागृहांतील कैदी यांचा समावेश करून सूक्ष्म कृती आराखड्यानुसार सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या अंतर्गत एकूण १ लाख २९ हजार २८८ नागरिकांची शारीरिक तपासणी केली जात आहे.
कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे शरीरावर लालसर अथवा फिकट रंगाचे, संवेदना नसलेले चट्टे, तेलकट व गुळगुळीत त्वचा, कानांच्या जाड पाळ्या, शरीरावर गाठी येणे तसेच हात-पायांच्या बोटांमध्ये बधिरता व अशक्तपणा जाणवणे इत्यादी. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी व उपचार आवश्यक आहेत.
सदर मोहिमेअंतर्गत प्रशिक्षित आशा सेविका व स्थानिक पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्यात येत असून, मार्गदर्शक सूचनांनुसार घरातील सर्व सदस्यांची शारीरिक तपासणी केली जाणार आहे. महिलांची तपासणी आशा सेविकांमार्फत तर पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवकांमार्फत केली जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी नाशिक जिल्ह्यात एकूण १,०५९ शोध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कुष्ठरोगाबाबतची शारीरिक तपासणी करून घ्यावी व कुष्ठमुक्त समाज निर्मितीस हातभार लावावा असे त्यांनी म्हटले आहे.

