नाशिक– सध्या सामाजिक वातावरण मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले असून दोन धर्मांमधील सलोखा बिघडण्यास अनेक गोष्टी कारणीभूत होत आहेत. त्यात राजकीय पक्षांकडून राजकीय लाभ उठविण्यासाठी काही घटनांचे भांडवल केले जात असल्याचा आरोप होत आहे. समाजातील काही विघातक घटकांमुळे शांततेत राहणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला असून यासंदर्भात थेट भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी लक्ष घातले आहे.

दिंडोरी तालुक्यातील वणी येथील हे प्रकरण आहे. एका हिंदू मुलीला काही वर्षांपासून एक युवक वेगवेगळ्या प्रकारे मानसिक त्रास देत होता. या त्रासामुळे मुलीचे नातेवाईकही भयभीत झाले होते. अखेरीस नेहमी होणाऱ्या या त्रासाला वैतागून संबंधित मुलीच्या कुटुंबाने वणी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. वणीहून ते नाशिकला स्थलांतरीत झाले. वणी गाव सोडल्याने संबंधित युवकाकडून होणारा त्रास कायमचा बंद होईल, अशी मुलीच्या कुटुंबाची समजूत होती. परंतु, तसे काही घडले नाही. त्या मुलाकडून मुलीचे आई-वडील, भाऊ यांना त्रास देणे सुरुच राहिले. ” माझ्याशी लग्न कर “, असा तगादा संबंधित युवकाने मुलीमागे लावला.

एवढेच नाही तर, आपल्याशी लग्न न केल्यास तुझ्या आई वडिलांचा खून करू’, अशी धमकी त्याने मुलीला दिली. वणी येथे होणारा त्रास, वणीहून नाशिक येथे आल्यावरही संबंधित युवकाकडून त्रास सुरुच राहिल्याने अखेर मुलीच्या आई-वडि‍लांनी हे प्रकरण भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यापुढे मांडण्याचे ठरविले. त्यानुसार सुनील केदार यांच्याकडे त्यांनी यासंदर्भात तक्रार केली. सुनील केदार यांनी गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणात लक्ष घातले.


सुनील केदार यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. संबंधित मुलगी हुशार असूनही केवळ तिला त्रास देणाऱ्या युवकाच्या भीतीमुळे तिच्या आई-वडि‍लांनी तिला बारावीच्या परिक्षेला बसू दिले नाही. या युवकाच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. या युवकाच्या कुटुंबांचा अवैध दारू व गुटख्याचा मोठा धंदा आहे.

केवळ भीतीमुळे वणी येथील कुणीही स्थानिक व्यक्ती त्यांच्याविरुध्द तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. संबंधित मुलीच्या आई-वडि‍लांनी भाजप नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांना घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. नंतर मुलीच्या आई-वडि‍लांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुनील केदार यांना या प्रकरणात वेगळाच संशय येत आहे. वणी पोलीस ठाण्याचे काही कर्मचारीही या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी संबंधित युवकाला सावध करुन त्याला परराज्यात पाठविल्याचा आरोपही केदार यांनी केला आहे.

पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती संशयित युवकाच्या मोबाईलवर कोणी पाठवली, त्याला ही माहिती तसेच त्याच्या वडिलांना कशी मिळाली याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. संबंधित पोलिसाला त्वरित निलंबित करून त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. वणी परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय वाढीस लागले असून जे पोलीस अशा अवैध व्यवसायांना साथ देत असतील, त्यांचीही चौकशी करण्यात यावी, असेही सुनील केदार यांनी नमूद केले आहे.