नाशिक – ठाणे येथे रविवारी आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवात मंचावर महिलांना नृत्य करावयास लावणे, डीजे याविरुध्द नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारची संस्कृती ही उत्तर भारतातील आहे. आपण महाराष्ट्रात अशा संस्कृतीचे अनुकरण कशासाठी करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, देशात दंगली घडवल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्यात अडकले पाहिजे, तुमचं इतर गोष्टीकडं दुर्लक्ष झालं पाहिजे, असा दावा केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या दाव्याला नाशिक येथील महंत सुधीरदास पुजारी यांनी उत्तर दिले आहे.

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, त्याप्रमाणे गणेशोत्सवातील वेगवेगळ्या गोष्टींवरुन सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते मत व्यक्त करु लागले आहेत. कोणी एखाद्याने गणेशोत्सवातील काही गोष्टींविषयी भूमिका मांडली की, कोणीतरी त्याविरोधात मत प्रदर्शित करीत आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवातील डीजे संस्कृतीली विरोध केल्यानंतर अनेकांनी त्यांचे समर्थन केले. तसेच काही जणांनी त्यांच्या भूमिकेला विरोधही केला. बापट यांनी डीजे संस्कृतीला विरोध करण्यामागील कारणांची मुद्देसुदपणे केलेली मांडणी अनेकांना आवडली असून डीजेमुळे रुग्ण, ज्येष्ठ व्यक्ती, गर्भवती तसेच लहान मुलांना कशाप्रकारे त्रास होत आहे, ते आता प्रखरपणे काही जणांकडून मांडले जात आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकारी, नेते यासंदर्भात आपली भूमिका मांडताना अधिक सावध झाले आहेत. आपली भूमिका धड विरोधीही नाही आणि धड समर्थनही करणारी नाही, अशी व्यक्त होईल, याची त्यांच्याकडून काळजी घेतली जात आहे. यादरम्यान, राज ठाकरे यांनी ठाण्यातील मनसे मेळाव्यात केलेली आक्रमक मांडणी सध्या चर्चेत आहे.

राज ठाकरे यांनी ठाणे येथे झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात, हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही आगामी काळात सतर्क राहण्याचे आवाहन केले. आपल्या नावाने, त्यांच्या नावाने गणेशोत्सवात कुणीतरी घुसवतील आणि दंगली घडवतील. तिकडेच दोन्ही समाजाला गुंतवून ठेवले जाईल. मूळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे इतकाच कार्यक्रम सध्या सुरू आहे. सध्या सगळीकडे धर्माची झिंग आलेली आहे. देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान असणे ठीक असले तरी धर्मांध असून चालणार नाही. सध्या देशात मुद्दामहून तसे वातावरण तयार केले जाते आहे. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी तुमच्यात राग निर्माण केला जातोय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.नाशिक येथील महंत सुधीरदास पुजारी यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्यांना आणि आरोपांना उत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचा आरोप महंत सुधीरदास यांनी केला आहे. हिंदू अत्यंत सहिष्णू असल्याचा दावा करताना त्यांनी मुंबईमध्ये अलीकडे घडलेल्या प्रसंगाचे उदाहरण दिले. त्या ठिकाणी प्रतिकात्मक निषेध नोंदविण्यात आला. सण उत्सवात दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशा पद्धतीची मांडणी ज्येष्ठ नेते राज ठाकरे यांनी करणे चुकीचे आहे. त्यातच वारंवार हिंदूंना दोषी धरणे हे त्याहून चुकीचे आहे, असे महंत सुधीरदास यांनी नमूद केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांनाही महंत सुधीरदास यांनी, राज ठाकरेंमध्ये गुंतून राहू नये, असा सल्लाही दिला आहे. मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्यात गुंतून राहायचे असेल तर त्यांना कुठलेही भविष्य नाही, असा दावाही महंत सुधीरदास यांनी केला आहे.