नाशिक – मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती काहिशी निवळत असताना नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात वाहून जाणाऱ्या पूर पाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मृत साठ्याच्या नावाखाली नाशिकच्या हक्काचे पाणी मराठवाड्याकडे पळवले जाते, असा आरोप करुन नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोदावरीचे उगमस्थान, पाणी नियोजन आणि नियंत्रण नाशिकमधून होत असताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये का ठेवले, असा प्रश्न करीत ते तातडीने नाशिकला हलविण्याची मागणी त्यांनी केली.
सलग तीन दिवस नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी त्याचा जोर काहिसा कमी झाला असला तरी ११ धरणांमधून विसर्ग सुरू आहे. गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील धरणांमधून सोडलेले पाणी नांदूर मध्यमेश्वरमार्गे मराठवाड्यातील जायकवाडीकडे जाते. सध्या नांदूर मध्यमेश्वरमधून ९४ हजार ४९७ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. समन्यायी तत्वावर पाणी वाटपाच्या मुद्यावरून नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाडा यांच्यात कायमच संघर्ष होत आला आहे. पावसात धरणे भरत असताना मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीकडे सोडल्याकडे लक्ष वेधत हा प्रकार नाशिकच्या हिताविरोधात असल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केला. अवघ्या ४८ तासांत नाशिकच्या धरणांमधून सुमारे ८.६ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहून गेले, त्यापैकी पाच टीएमसी पाणी प्रत्यक्ष जायकवाडीत पोहोचणार आहे. हा विसर्ग करताना नाशिकच्या भविष्यांतील गरजांचा विचार करण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘महामंडळाचे मुख्यालय नाशिकला हलवा’
समन्यायी तत्वावर पाणी वाटपाचा कायदा केवळ नाशिकसाठीच आहे का, असा प्रश्न करुन आमदार फरांदे यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. मराठवाड्याच्या राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे काही अधिकारी नाशिकच्या हिताकडे दुर्लक्ष करतात. जायकवाडीतील किती मृत साठा वापरण्यात आला, त्याचा अचूक हिशेब मांडण्यात अधिकारी अपयशी ठरले. नियमांचे उल्लंघन करून नाशिकचे पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांंकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जायकवाडीतील २६ टीएमसी मृत साठा उपलब्ध असतानाही त्याचा योग्य वापर न करता कागदोपत्री परिस्थिती वेगळी दाखवून नाशिकच्या धरणातील पाणी सोडले जाते. मृत साठ्याच्या नावाखाली नाशिकच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रकार थांबला पाहिजे, याकडे लक्ष वेधत फरांदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिकमध्ये हलविण्याची मागणी केली.
