Nashik BJP Corporators Politics: अंतर्गत मतभेद शिगेला पोहोचल्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपला बहुमत असतानाही खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. गुरुवारी सकाळीच भाजपच्या सर्व म्हणजे ७२ नगरसेवकांना पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले. संबंधितांना आता अज्ञात ठिकाणी रवाना केले जाणार आहे. ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली जात आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक विविध कारणांनी गाजली. इच्छुकांच्या मोठ्या संख्येने तिकीट वाटपापासून भाजपमध्ये बंडखोरी, नाराजी नाट्य सुरू झाले होते. यातून पक्षाच्या एबी अर्जांची पळवापळवी झाली. निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमतापेक्षा अधिक म्हणजे तब्बल ७२ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. सर्व काही शांत होत असताना महापौर, उपमहापौर नावे निश्चितीवरून पुन्हा मतभेद झाले. त्याची परिणती थेट शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या राजीनाम्यात झाली. परंतु, तो औटघटकेचा ठरला. प्रदेश भाजपशी चर्चेनंतर समाधान झाले आणि आपण राजीनामा मागे घेतल्याचे शहराध्यक्ष केदार यांनी म्हटले होते.
या वादावर महापौर, उपमहापौरपदाचा कार्यकाळ निम्म्यावर म्हणजे सव्वा वर्षाचा करून तोडगा काढला गेल्याचे सांगितले जाते.ज्या राजीनाम्यावरून शहराध्यक्षांनी गोंधळ उडवून दिला, तो प्रदेश भाजपकडे पोहोचला नसल्याची चर्चा आहे. या कृतीतून केदार यांनी नेमके काय साधले, याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. केदार हे महापौर, उपमहापौर पदासाठी काही विशिष्ट नावासाठी आग्रही होते. त्यामागील कारणांवर संबंधितांकडून बोट ठेवले जात आहे.
या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महापौर, उपमहापौर निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. गुरुवारी खुद्द महाजन नाशिकमध्ये दाखल होत आहेत. भाजपच्या सर्व नगरसेवकांना सकाळी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात बोलावण्यात आले. या ठिकाणी त्यांना नाश्ता करून इगतपुरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. महापौरपदासाठी भाजपने हिमगौरी आडके व उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिलेली आहे. बहुमतापेक्षा १० नगरसेवक पक्षाकडे अधिक आहेत. महापौरपदासाठी शिवसेना ठाकरे गटाने सीमा पवार तर, उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे हे रिंगणात आहेत. एकंदर परिस्थिती लक्षात घेत भाजपला सर्व नगरसेवकांना सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी करावी लागली आहे.

