नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील २८ प्रमुख रस्त्यांवर युटिलिटी अर्थात उपयोगी कामांसाठी चाललेल्या खोदकामाने नाशिककर त्रस्तावले असताना महापौर हिमगौरी आडके यांनी या प्रश्नाचा संदर्भ घेत नव्या पत्ररुपी संवादाच्या उपक्रमाची मुहुर्तमेढ रोवली आहे. विविध विकास कामांमुळे खोदलेले रस्ते आणि निर्माण झालेल्या अडचणींची आपणांस जाणीव आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत ही कामे लवकरात लवकर पूर्ण करुन नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
महापौरपदी निवड झाल्यानंतर हिमगौरी आहेर यांनी पहिल्या १०० दिवसांत शहरातील सर्व म्हणजे ३१ प्रभागाचा दौरा करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता त्यांनी नाशिककरांशी पत्ररुपी संवाद साधण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून त्यांनी नाशिककरांना पत्र लिहिले आहे. महापालिकेच्या एनएमसी कनेक्ट ॲपवरून शहरवासीयांना स्थानिक समस्यांची ऑनलाईन तक्रार करता येते. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे शहरात अनेक रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे.
जिथे काम पूर्ण झाले, त्याठिकाणी माती व खडी टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. अनेक भागातील वाहतूक वळवल्याने नागरिकांना दुरवरून फेरफटका मारावा लागत आहे. नाशिककरांच्या अस्वस्थतेवर महापौरांनी पहिल्या पत्रात फुंकर घातली आहे. कधीकाळी छोटेसे टुमदार नाशिक आज विस्तीर्ण वटवृक्षासारखे वाढले आहे. छोटी घरे जाऊन उंच इमारती उभ्या राहिल्या असून शहराच्या मध्य भागातून १० मिनिटांत कुठेही पोहोचता येते, हे वाक्य इतिहासजमा झाले आहे.
वाहतूक, प्रदूषण, वाढती लोकसंख्या विकासाबरोबर ही आव्हाने आली आहेत. सध्या विविध विकास कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणींबद्दल महापौरांनी दिलगिरी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, हे माझे कर्तव्य असेल. आपल्यासमोर पुढील वर्षी होणारा कुंभमेळा आहे. जगभरातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. आपण महाकुंभाचे यजमान आहोत. त्यांच्यासाठी शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आदर्श बनवणे ही केवळ प्रशासनाची नाही तर प्रत्येक नाशिककराची जबाबदारी असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी म्हटले आहे. महापालिका व शासनाच्या माध्यमातून जे उत्तम करता येईल ते नक्की केले जाईल. या प्रवासात नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकणे, वाहतुकीचे नियम पाळणे, ध्वनी व वायू प्रदूषण कमी करणे आणि आपले शहर आपले घर म्हणून जपणे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यापुढील प्रत्येक महिन्याला अशाच पत्राद्वारे नाशिककरांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

