नाशिक – कुंभमेळ्यात शहरात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये म्हणून साकारण्यात येणाऱ्या ६६ किलोमीटर लांबीच्या नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंग रोडने परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. पुण्यातील पीएमआरडीए आणि मुंबईतील एमएमआरडीएच्या धर्तीवर आता नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘एनएमआरडीए’ क्षेत्रात कायापालट होणार आहे. या मार्गामुळे केवळ वाहतूक कोंडीच फुटणार नाही, तर एनएमआरडीए क्षेत्रातील बांधकामांना मोठी गती मिळणार आहे

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘नाशिक परिक्रमा’ मार्ग (रिंग रोड) प्रकल्पास केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय पातळीवरील हालचाली गतिमान झाल्या आहेत. एमएसआयडीसीमार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येतील. तेव्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक जटील होऊ शकतो. त्याची झळ भाविकांसह नाशिकमधून पुढे इतरत्र मार्गस्थ होणाऱ्या वाहनांना बसणार आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी हाती घेण्यात आलेला नाशिक परिक्रमा मार्ग आडगावच्या डीआरडीओ जंक्शन, दिंडोरी रस्त्यावर ढकांबे शिवार, नाशिक-पेठ महामार्ग, गंगापूर रोड, गोवर्धन-त्र्यंबक महामार्ग-नाशिक-मुंबई महामार्गावर विल्होळी, सिन्नर फाटा व आडगाव असा असणार आहे. त्यासाठी ४०६ हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांपासून १४ गावांत मोजणी सुरू झाली झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

चार पदरी परिक्रमा मार्गाला समृद्धी महामार्गासारखे कुंपण असणार नाही. तो जमिनीचा विचार करून आवश्यक तितकी उंची धरून बांधला जाईल. रिंग रोडच्या दोन्ही बाजुला सात मीटरचे सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) असल्याने आणि हा रोड नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येणार असल्याने त्याची गणना विकास आराखड्यातील रस्ता (डीपी रस्ता) म्हणून होईल. त्यामुळे बिल्डिंग व ‘कंट्रोल लाईन’चे बंधन निर्मुक्त होण्यास मदत होणार आहे. वळण रस्त्याच्या भोवती एनएनआरडीए नियमावली व शासन धोरणानुसार बांधकामे करणे शक्य होणार आहे.

सेवा रस्ते आणि डीपी रोडचा दर्जा मिळाल्याने या मार्गालगत निवासी व व्यावसायिक संकुलांचे जाळे निर्माण होऊन नाशिकचा विस्तार होणार आहे. सद्यस्थितीत घरांच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकांना शहरात घर घेणे आवाक्याबाहेर ठरते. शहराच्या तुलनेत परिक्रमा मार्गालगतच्या भागात तुलनेत कमी किंमतीत घरे उपलब्ध होऊ शकतील. मार्गालगत लॉजिस्टिक पार्क, हॉटेल्स आणि छोटे- मोठे उद्योग आकारास येतील. एकेकाळी शांत असणारा परिसर व्यापारी उलाढालीचे केंद्र होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.