नाशिक – संपूर्ण राज्यात नाशिकमधील म्हाडा घोटाळा गाजत आहे. या घोटाळ्यात ४० पेक्षा अधिक बिल्डर आणि विकसकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. त्यातच दुसरीकडे,. एक नवीन जमीन फसवणूक प्रकरण बाहेर आल्याने नाशिकच्या बांधकाम व्यवसायात चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिकमधील प्रसिध्द बिल्डर आणि विकसकांनी.बिगरशेती (एनए) प्लॉट करुन देण्याचे आणि विक्रीचे आमिष दाखवित गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याचे प्रकरण उघड झाले असून याप्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायदा) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपासून नाशिकचे म्हाडा घोटाळा प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात शासनाचीही फसवणूक करण्यात आल्याने हे प्रकरण यंत्रणेकडून गांभिर्यपूर्वक हाताळले जात आहे. या प्रकरणाचे एकेक कंगोरे बाहेर येऊ लागले आहेत.
म्हाडा घोटाळ्यात एक नवीन घडामोड झाली आहे. ॲड. हेमंत सातभाई (५३) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नाशिकमधील मखमलाबाद शिवारातील वकीलनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या नियोजित अभिन्यासाशी (ले-आउट) संबंधित हे फसवणुकीचे प्रकरण आहे.
तक्रारदार ॲड. हेमंत सातभाई हे १९९८ मध्ये वकीलनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचे सभासद झाले. संशयित बिल्डरांच्या शुभशनी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने बिगरशेती (एनए) प्लॉट विकसित करून देण्याचे आमिष त्यांना दाखवले होते. त्यामुळे सातभाई यांनी प्लॉट नंबर १२५ (क्षेत्रफळ ३६० चौरस वार) साठी संपूर्ण रक्कम भरली. त्यानंतर त्यांना लेटर ऑफ अलॉटमेंटदेखील देण्यात आले. परंतु, संशयितांनी कायदेशीर खरेदीखत करण्यास टाळाटाळ केली. आर्थिक फायद्यासाठी संशयित बिल्डर आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी संगनमत केले. आणि २४ डिसेंबर २०२० रोजी बनावट खरेदीखताद्वारे संबंधित प्लॉटची विक्री दुसऱ्या व्यक्तीला परस्पर केली.
आपल्याप्रमाणे इतरही काही सभासदांना फसवविण्यात आल्याचे ॲड. हेमंत सातभाई यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी मंगळवारी रात्री संशयित जितेंद्र ठक्कर, काश्मिरा शहा, अनघा गुजर, बाबूलाल शहा, राजेश शहा, रोहित शहा, सुरेंद्र शहा, अश्विन जसपरा, राजेंद्र शहा आणि संस्थेचे पदाधिकारी शरद कुटे, भास्कर पवार यांच्याविरुध्द इतर कलमांसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, म्हाडा घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याने नाशिक पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत आहे. नवीन गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, अटक टाळण्यासाठी या प्रकरणातील काही बड्या संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती पुढे आली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड अधिक तपास करत आहेत.
