​नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली व मुंबई स्तरावर पाठपुरावा करून नाशिकच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्यात येईल. त्या निधीतून दीर्घकाळ टिकणारी, शाश्वत आणि नाशिककरांच्या लक्षात राहतील, अशी विकास कामे करण्यात येतील, असे आश्वासन नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले. औद्योगिक वसाहतींकडे विशेष लक्ष दिले जाईल. एमआयडीसीतील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात निधीची स्वतंत्र तरतूद केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

​नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), नाईस, लघु उद्योग भारती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, निवेक आदी औद्योगिक संघटनांच्या वतीने निमा सभागृहात महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर आहेर यांनी उद्योजकांशी संवाद साधला.

यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, निवेकचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, लघु उद्योग भारतीचे निखिल तापडिया, उद्योग आघाडीचे सतीश कोठारी, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्र फड आदी उपस्थित होते. नाशिक शहरात सातपूर व अंबड दोन औद्योगिक वसाहती आहेत.

येथील रस्त्यांविषयी उद्योजक व कामगार वर्गातून नेहमीच नाराजी प्रगट होत असते. ​महापौर हिमगौरी आहेर यांनी नाशिक एमआयडीसीतील दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या मंजुरीसाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार असून दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून एमआयडीसीतील रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाईल. उद्योग क्षेत्र हा नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.

शहराच्या विकासासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स कमिटी’ स्थापन केली जाईल. भावी पिढीच्या दृष्टीने नाशिकमध्ये कौशल्य विद्यापीठ अर्थात स्किल युनिव्हर्सिटी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आयटी क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देत नाशिकला रोजगार निर्मितीच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. ​नाशिक हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील.

स्वच्छतेच्या बाबतीत नाशिकला इंदूरच्या धर्तीवर विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. उपमहापौर विलास शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना नाशिकच्या सौंदर्यीकरणासाठी उद्योजकांनी काही चौक व मोकळ्या जागा दत्तक घेऊन त्या हिरव्यागार करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविकात निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामांना गती देण्याचा विषय मांडला.

विमानतळासाठी नाशिकहून सिटी लिंकच्या अधिक फेऱ्या, नव्या गुंतवणुकीसाठी सवलती, भुयारी गटार योजना व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजनांची गरज त्यांनी व्यक्त केली. विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतील रस्ते चकाचक करावेत, बंद पथदीप सुरू करणे, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, नाशिकमधील प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलावीत तसेच बंद जकात नाक्यांच्या ठिकाणी ट्रक टर्मिनल उभारावे, अशा सूचना केल्या. कार्यक्रमात उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.