नाशिक – आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्च प्रदर्शन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडुंसाठी राज्य शासनाने एक संधी दिली आहे. राज्यातील क्रीडा संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने मिशन लक्षवेध योजना आखण्यात येत आहे. या अंतर्गत ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या १२ क्रीडा प्रकारांचा समावेश असून नाशिक जिल्ह्यासाठी त्यापैकी मैदानी, धनुर्विद्या, नेमबाजी आणि रोइंग हे चार क्रीडा प्रकार देण्यात आले आहेत. या चार क्रीडा प्रकारांसाठी प्रत्येकी २० खेळाडूंची उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.

अनेक खेळाडुंना उत्तम प्रकारचे प्रशिक्षण मिळत नसल्याने ते मागे राहतात. गुणवत्ताही असूनही ते इतरांच्या स्पर्धेत टिकू शकत नाहती. अशा खेळाडूंना मिशन लक्षवेध ही योजना आधार आहे. खेळाडुंच्या उच्च प्रगतीसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना त्रिस्तरीय आहे. राज्यस्तरावर ‘हायपर फॉर्मन्स सेंटर’, विभागीय स्तरावर ‘स्पोर्टस एक्सलन्स सेंटर’ आणि जिल्हा स्तरावर ‘क्रीडा प्रतिभा विकास केंद्र’ अशा प्रकारचे हे तीन स्तर राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटर देण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातून केवळ मैदानी, धनुर्विद्या, नेमबाजी आणि रोइंग या चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडुंची निवड केली जाणार आहे. अर्जदार खेळाडू हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२५ वर्षाआतील खेळाडू मुले/ मुली अर्ज करू शकतात. अर्जाबरोबर जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत दोन वर्षांतील क्रीडाविषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे तीन छायाचित्र, बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे समंतीपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. राज्यस्तरावरील पदकप्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडू (SGFI, AFI, Khelo India national only) अर्ज करण्यास पात्र आहेत. मागील दोन वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येवून क्रीडा कौशल्य व तंदूरूस्त चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त डॉक्टरकडून दिलेले वैध वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची निवड तज्ज्ञ समितीद्वारे करण्यात येणार असून त्यांचा निवास, भोजन, पूरक आहार संच आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च योजनेंतर्गत केला जाणार आहे. यासाठी खेळाडूंनी सहा मार्चपर्यंत परिपूर्ण अर्ज विभागीय क्रीडा संकुल, सर्व्हे क्रमांक १९५, हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक ४२२००३ येथे कार्यालयीन कामाकालाच्या दिवशी जमा करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभागाच्या उपसंचालक स्नेहल साळुंखे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.