नाशिक – राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाने सर्वाधिक लक्ष वेधले आहे. महायुती राज्यात इतरत्र सुसाट असताना नाशिक मतदारसंघात मात्र एका अपक्षाने त्यांना हादरविले आहे. गोकुळ गिते या अपक्षाने महायुतीची डोकेदुखी वाढवली असून गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा, यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत असल्याने आता नेमके काय करावे, हाच प्रश्न महायुतीला सतावू लागला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याप्रमाणे भाजपसाटी कायम संकटमोचक भूमिका निभावणारे मंत्री गिरीश महाजन हे प्रथमच कोणा एका अपक्षासमोर हतबल झाले असून दोन्ही नेते एकाच दिवशी नाशिकमध्ये असतानाही एकमेकांना न भेटण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिक विधान परिषदेच्या मतदार संघातून महायुतीकडून शिवसेनेच्या शिंदे गटाचे नरेंद्र दराडे हे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुध्द भाजपचे नेते गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांची अपक्ष उमेदवारी आहे. याशिवाय प्रसाद हिरे हे भाजपचे बंडखोरही रिंगणात आहेत. प्रसाद हिरे यांच्यापेक्षा गोकुळ गिते यांची उमेदवारी अधिक डोईजड असल्याने त्यांना कसे शांत करता येईल, याकडे महायुतीच्या नेत्यांनी लक्ष दिले आहे. गोकुळ गिते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा, या अपेक्षेने त्यांचे मन वळविण्यासाठी शुक्रवारी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये आले. दिवसभर जंगजंग पछाडूनही उदय सामंत यांना गोकुळ गिते हे काही भेटलेच नाही.
निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले गोकुळ गिते यांनी, मी भाजपचा बंडखोर नाही. माझ्यावर दबाव आणू नका, असे वक्तव्य केले. त्यासंदर्भात उदय सामंत यांनी नरमाईचा सूर आळवला. आम्ही दबाव आणत नाही. आम्ही सन्मानपूर्वक विनंती केली आहे. गिरीश महाजन आणि माझ्या विनंतीला गोकुळ गिते मान देतील, असे त्यांनी नमूद केले असले तरी दुसरीकडे, महाजन आणि सामंत हे दोन्ही नेते नाशिकमध्ये उपस्थित असताना एकमेकांशी सहज भेटू शकले असते. परंतु, तसे न झाल्याने शिंदे गट आणि भाजप यांच्यात नाशिकच्या जागेवरुन बिनसल्याची चर्चा आहे.
गोकुळ गिते यांच्या उमेदवारीमागे भाजपचा हात असल्याचेही बोलले जात आहे. महाजन आणि सामंत यांची भेट न होण्याचे तेही एक कारण मानले जात आहे. त्यातच जळगाव विधान परिषद मतदार संघात भाजपविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला नगरसेविकेने बंडखोरी केली आहे. नाशिकमध्ये गोकुळ गिते यांची बंडखोरी कायम असताना जळगावमध्ये आपण का नमते घ्यायचे, असाही एक सूर आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव या दोन्ही महत्वपूर्ण मतदारसंघातील बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी झाली आहे.
