नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते हे विजयी झाल्याचे निश्चित झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि कुटूंबियांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. समोर महाविकास आघाडीचा उमेदवार मैदानात नसताना आणि कागदावर सर्व गणित महायुतीच्या बाजूने असतानाही पराभूत व्हावे लागल्याने नरेंद्र दराडे यांना मोठा धक्का बसला आहे. महायुतीची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्यानेच अपक्ष गोकुळ गिते यांचा विजय झाल्याचे उघड झाले. या अनुषंगाने नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांची प्रतिक्रिया बोलकी म्हणावी लागेल.
विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघासाठी ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नरेंद्र दराडे उमेदवार होते. दुसरीकडे माघार घेऊनही मतपत्रिकेवर नाव कायम राहिलेले भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गिते यांची उमेदवारी होती. विरोधी उमेदवार रिंगणात नाही. एक बंडखोर आणि एक अपक्ष दोघांनीही माघार घेतलेली. असे असताना नरेंद्र दराडे यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, कागदावरील गणित प्रत्यक्षात उतरेलच असे नाही. राजकारणात तर तसे बिल्कूलही गृहित धरता येत नाही. तोच अनुभव निवडणूक निकालानंतर उमेदवार नरेंद्र दराडे यांना आला. आपल्याशी विश्वासघात झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी शिवसेनेचा केसाने गळा कापण्यात आला, असा संताप व्यक्त केला. ‘घरका भेदी लंका ढाएँ’ असे म्हत कुणाल दराडे यांनी मित्रपक्षांनीच घात केल्याचे सांगितले. “मित्रपक्षांवर आम्ही ज्या अपेक्षेने विश्वास ठेवला होता, तसे मतदान झाले नाही. शिवसेनेचा शंभर टक्के विश्वासघात झाला हा केवळ दराडे कुटूंबाचा विश्वासघात नाही तर, शिवसेनेचा विश्वासघात आहे. भाजपची २०० मते आणि शिवसेनेची१७० मते होती. उर्वरित मते महाविकास आघाडी व इतरांची होती. समोरच्या उमेदवाराची आकडेवारी पाहता महायुतीमध्ये दगाफटका झाल्याचे स्पष्ट दिसते. निवडणुकीच्या काळात, मी माघार घेतो, मी तुमच्याबरोबर आहे, आम्ही प्रचार करत नाही, असे सांगून दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले. शेवटी केसाने गळा कापला गेला “, अशी टीका दराडे यांनी केली. “आता असे वाटायला लागले की समोरासमोर लढत झाली असती तर बरे झाले असते. नाशिक जिल्ह्यात या निवडणुकीच्या संदर्भात जे काही घडले, त्याची सविस्तर माहिती एकनाथ शिंदे यांना देणार आहे. इत्यंभूत अहवाल एकनाथ शिंदे यांना देणार आहे “, असेही कुणाल दराडे यांनी नमूद केले.
