नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात महायुतीच्यावतीने नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेवरून भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात रस्सीखेच झाली होती. शिंदे गटातही उमेदवारीसाठी स्पर्धा होती. महायुतीतील अवस्थता, नाराजी मित्रपक्षांचे मंत्री, आमदारांच्या अनुपस्थितीतून ठळकपणे अधोरेखीत झाली. दराडे यांचा अर्ज भरताना नाशिकच्या भाजप आमदार सीमा हिरे, महापौर व पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, राष्ट्रवादीचा एकही आमदार नव्हता. इतकेच नव्हे तर, गिरीश महाजन, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ हे मंत्री तसेच शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे देखील अनुपस्थित होते. यावर स्पष्टीकरण देताना शिवसेना शिंदे गटाची दमछाक झाली.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता. जागा वाटपाच्या घोळामुळे अखेरच्या दिवशी महायुतीकडून नरेंद्र दराडे यांनी अर्ज दाखल केला. याप्रसंगी शिक्षणमंत्री दादा भुसे, भाजपच्या आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, भाजपचे सुनील केदार, राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकची जागा पूर्वी एकसंघ शिवसेनेकडे होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये् भाजपचे वर्चस्व वाढल्याने त्यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला गेला. नाशिकच्या जागेसाठी मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच झाली. या जागेच्या मोबदल्यात शिवसेनेला एखाद्या महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली होती. दरम्यानच्या काळात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गिते यांनी भाजपकडून तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, त्यांचे सूचक व अनुमोदक सर्व भाजपची मंडळी आहे. कोणत्याही परिस्थितीत मंत्री महाजन हे नाशिकची जागा भाजपसाठी सोडवतील, असा विश्वास भाजपच्या मंडळींना होता. परंतु, ती शिंदे गटाला गेल्यामुळे त्यांच्या गोटात अस्वस्थता आहे. जागा वाटपाच्या वाटाघाटीत शिवसेना शिंदे गटाने नाशिकमध्ये भाजपला शह दिला असला तरी पुढील टप्पा पार करणे त्यांच्यासाठी तितके सोपे नाही. भाजपचे गणेश गिते यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे गोरख बोडके यांनीही अपक्ष अर्ज भरला. नरेंद्र दराडेंचा अर्ज भरताना अनेकांच्या अनुपस्थितीचा संबंध महायुतीतील नाराजीशी जोडला गेला.

दादा भुसे यांचे स्पष्टीकरण

नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकत्रित काम करणार असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार उपस्थित नसल्याबाबत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संवाद झाला असून ते मुंबईत आहेत. त्यांच्या पक्षाचे रंजन ठाकरे उपस्थित असल्याचे नमूद केले. महायुती म्हणून विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे गोरख बोडके यांची नाराजी दूर केली जाईल. भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे जळगावमध्ये तेथील उमेदवाराच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आहेत. तेथील अर्ज दाखल करून नाशिकला येण्यास वेळ लागतो असे कारण भुसे यांनी दिले. आमदार सुहास कांदे हे शिवसेनेचे जबाबदार नेते असून ते काही कामानिमित्त बाहेर असू शकतात. आमच्यात कोणताही किंतु, परंतु नाही, असे स्पष्टीकरण मंत्री भुसे यांनी दिले. दरम्यान, आमदार कांदे हे अंजूम कांदे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. पक्षाने नरेंद्र दराडे यांना संधी दिल्याने आमदार कांदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांंच्या अनुपस्थितीबाबत तशीच चर्चा रंगली आहे.