नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी दिसत होती, की पक्षातून कोणी ती लढविण्यासाठी उत्साहाने पुढे आले नाही. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतदारांमध्ये मोठी तफावत होती. यामुळे ठाकरे गटातून कोणी उत्सुक नव्हते. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उमेदवार न देण्याच्या घेतलेल्या निर्णयात कुठलीही चूक नव्हती, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गट आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचे म्हटल्याने ठाकरे गटाकडून भाजप बंडखोराला बळ दिले जाण्याची शक्यता
व्यक्त होत आहे.

नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या खा. राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दोन इच्छुक उमेदवार असताना ठाकरे गटाने माघार घेतल्याने संशय व प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याबाबत त्यांनी वसंत गिते आणि अनिल कदम यांनी पक्षाच्या सूचनेनुसार अर्ज घेतले होते असे नमूद केले. अर्ज आणणे आणि ते भरणे यात फरक आहे. उमेदवारीसाठी जो उत्साह दिसायला पाहिजे, तो दिसला नाही. आमच्याकडे १०० च्या वर मतदान असते तरी आम्ही निवडणूक लढवण्याचे धाडस केले असते. उमेदवार न देण्याचा निर्णय घेताना आपणास अंधारात ठेवले गेले नाही. पक्ष प्रमुखांशी चर्चा झाली. विधान परिषदेच्या १७ जागांच्या निवडणूका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या नाहीत. मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जे निकाल लागले, त्यामुळे काही ठिकाणी निकाल स्पष्ट दिसतात. ज्या कोणाला लढायची इच्छा आहे, ते लढतील. बिनविरोध निवडणुका करायच्या नाहीत हे आमचे धोरण होते. त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले. नाशिकमध्ये स्वताहून कोणी पुढे आले असते, तर आम्ही नक्कीच त्याच्या मागे उभे राहिलो असतो, असे खा. राऊत यांनी नमूद केले.

निकालावेळीच कळणार…

नाशिकमध्ये शिवसेनेला (एकनाथ शिंदे) रोखण्यासाठी ठाकरे गट भाजपच्या बंडखोरांना बळ देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपच्या मदतीने हा डाव रचला गेल्याचे सांगितले जाते. यावर खा. संजय राऊत यांनी निकालाच्या वेळी याची स्पष्टता होईल असे नमूद केले. शिवसेना शिंदे सेना म्हणजे महाराष्ट्रात काही फार मोठा फोर्स नाही. हा पैशांचा फोर्स आहे. कंत्राटदारांकडून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला हा पैसा आहे. अशा प्रकारचे सर्व पातळीवरील राजकारण थांबायला पाहिजे, ही आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत भाजपच्या बंडखोरांना बळ दिले जात असल्यावर त्यांनी भाजप काही दानशूर आणि पवित्र पक्ष आहे असे नाही. पण, आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू शिवसेना शिंदे गटच असल्याचे स्पष्ट केले. यामुळे ठाकरे गटाच्या निर्णयावर साशंकता निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी ५० कोटी रुपये घेतले जात असल्याच्या आमदार रोहित पवार यांच्या आरोपांशी खा. राऊत यांनी सहमती दर्शविली. स्थानिक स्वराज्य संस्था हा एक मोठा घोडेबाजार आहे. यात सगळ्यांना उतरणे जमत नाही. त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीपासून लांब रहावे लागते. नाशिकमध्येही सर्वांना घोडेबाजार काय असतो ते कळेल, असे त्यांनी सूचित केले.