मुख्यमंत्र्यांचे तुकाराम मुंढेंना अभय, अविश्वास प्रस्ताव मागे

आयुक्त तुकाराम मुंढे यांना हटविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना या प्रकरणावरून वरिष्ठांकडून जोरदार चपराक बसली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातr दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. उद्या (शनिवारी) होणाऱ्या महासभेतील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांना हटविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना या प्रकरणावरून वरिष्ठांकडून जोरदार चपराक बसली आहे. धडक कामगिरीमुळे नवी मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही सर्वपक्षीयांच्या रोषाला तोंड द्यावे लागलेले मुंढे यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यावर शनिवारी सर्वसाधारण सभेत चर्चा होणार होती.

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावत तो पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले. अनावश्यक खर्चाला पायबंद घालत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घातला. यामुळे भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांना हादरा बसला. नाशिककरांवर प्रचंड करवाढ लादल्याचे आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाने सुरु केला.

नाशिकमधील स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करताना पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवल्याचे समोर आले होते. मात्र, या प्रकरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका होत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी या घडामोडींची दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश दिले. यानंतर महापौर रंजना भानसी यांनी माघार घेतली आहे. तुकाराम मुंढेंविरोधातील प्रस्ताव मागे घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nashik mnc tukaram mundhe commissioner no confidence motion bjp cm devendra fadnavis

ताज्या बातम्या