नाशिक – शहरातील सर्व रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात खोदलेले रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रस्त्यावर येणारी मुरूम आणि माती, यामुळे नाशिककरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहेत. कुंभमेळ्यासाठी एकाचवेळी हाती घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे निर्माण झालेल्या बिकट स्थितीवर नाशिककरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने एकाचवेळी २८ रस्त्यांची कामे हाती घेतली. यासह अन्य रस्त्यांवर उपयोगिता (युटीलीटी) कामांसाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेले काही भाग मुरूम व माती टाकून समतलीकरण करण्यात आले. अनेक ठिकाणी आजही ही कामे प्रगतीपथावर आहेत. नियोजनाअभावी चाललेल्या कामांमुळे पावसाळ्यात कठीण स्थिती निर्माण झाली आहे. नवीन नाशिक, इंदिरानगर, पंचवटी, नाशिकरोड, सातपूरसह सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत अशा सर्वच भागात खोदकामामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात काही रहिवाशांनी आपले म्हणणे मांडले आहे.

विलास सोनार यांनी मुद्रणालय परिसर, नांदुर नाका, काठे गल्लीसह आसपासच्या काही भागांमध्ये खोदकाम झाल्याचे नमूद केले. नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. एक काम पूर्ण होण्याआधी दुसरे काम सुरू होते. खड्डे, रस्त्यावर माती यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महात्मानगर परिसरात एबीबी सर्कलकडून महात्मानगर पाण्याची टाकी तसेच भोसलाकडे येणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले. ती माती रस्त्यावर येत असून वाहनचालक पाण्यातून गाडी नेण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. या रस्त्यावर विद्यार्थ्यांची वर्दळ असल्याने हा चिखल, गाळ जीवावर बेतत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मान, पाठदुखीचा त्रास

पाथर्डी परिसरात राहणाऱ्या गणेश यादव यांनी, पाथर्डी फाट्याकडून गौळाणेकडे येणारा रस्ता तसेच अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याकडे लक्ष वेधले. रिमझिम पावसातच रस्त्यांची चाळणी झाली असून खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. खड्ड्याचा अंदाज येत नाही. यामुळे चालकाला वाहन खड्ड्यात आदळल्यावर एकदम वर उचलल्यासारखे होते. त्यामुळे अनेकांना मान, पाठीची दुखणी मागे लागली आहेत. पंचवटीतील रस्ते काही अंशी चांगले असले तरी. पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर पाणी जमा झाले आहे, तपोवन रोड, मखमलाबाद रोड, पेठरोड या ठिकाणी खड्डे आहेत. महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात माती, खडी टाकली जात आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली.

एमआयडीसीतील रस्तेही खड्डेमय

सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत परिसरात गंगा विहार हॉटेल, फॉरट्युना कंपनीसमोर, फॉक्स कंपनीच्या वळणावर खड्डे आहेत. तीन पावसाळ्यापासुन हीच स्थिती आहे. सातपूर परिसरात महिंद्रा कंपनीच्या मागील बाजुकडील रस्ता, पाईप लाईन रोड, सीएटकडून येणारा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. रस्त्यांची वाट लागली आहे. महापालिका प्रशासन या विषयी काहीही करत नसल्याची तक्रार अनेकांनी केली.

महापालिकेच्या वतीने खड्ड्यांमध्ये मुरूम आणि खडी टाकली जात आहे. रस्त्यावर असलेल्या मातीमुळे चिखल होत आहे. चिखल किंवा मातीपेक्षा खडी, मुरूम चांगली आहे. खडी मोठ्या प्रमाणात टाकण्यात येणार आहे. – मनीषा खत्री (महापालिका आयुक्त)