नाशिक – उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली असताना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी कोट्यवधींच्या ऑफर्स आणि कर्जमुक्त होण्याची संधी धुडकावत ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटालाच धक्का दिल्याचे मानले जात आहे. फोडाफोडीसाठी प्रत्येक खासदाराला १५ कोटीचे टोकन आणि १०० कोटींच्या विकास कामांच्या ऑफर्स दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ठाकरे गटाच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून कसे प्रयत्न झाले, याच्या कथा समोर येत आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सिन्नर येथील निवासस्थानी गेल्या एप्रिलमध्ये काही मंडळी आली होती. त्यांनी दोन ते अडीच तास खा. वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांच्याशी चर्चा करून मनधरणी केली. परंतु, वाजे कुटुंबियांनी पक्षांतरास नकार दिल्याने शिंदे गटाचे प्रयत्न असफल ठरले, अशी माहिती पुढे येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार फुटण्याच्या मार्गावर असून त्यांच्याकडून लोकसभेत स्वतंत्र गट स्थापून शिवसेना शिंदे गटात सामील होण्याची तयारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे महाराष्ट्रात एकूण नऊ खासदार आहेत. त्यातील सहा खासदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याचे बोलले जाते. या घटनाक्रमात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे अपवाद ठरले. बुधवारी तेही रेल्वेने दिल्लीत पोहोचले. नवी दिल्लीतील खा. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा पुनरुच्चार केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. नाशिक शहरात भाजपचे वर्चस्व असताना लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला अर्थात महायुतीला ही जागा गमवावी लागली होती. यामुळे ‘ऑपरेशन टायगर’मध्ये नाशिकचे खासदार वाजे यांना सहभागी करण्यासाठी अतोनात प्रयत्न झाले. परंतु, ते बधले नाहीत. १४ एप्रिल रोजी शिवसेना शिंदे गटाचे देहू व ठाणे येथील दोन पदाधिकारी खा. वाजे यांच्या निवासस्थानी आले होते. खा. वाजे यांनी आपण काही निर्णय घेऊ शकत नाही, तुम्ही वडील प्रकाश वाजे यांच्याशी चर्चा करावी असे सांगून ते घराबाहेर पडले. म्हणजे संबंधितांशी खासदार वाजे यांची फारशी चर्चा झाली नाही.
आलेल्या व्यक्तींनी सुमारे दोन ते अडीच तास प्रकाश वाजे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. यावेळी ३० कोटी आणि १०० कोटींची विकास कामे अशा ऑफर दिल्याचे बोलले जाते. खा. संजय राऊत यांनी समाजमाध्यमातून केलेले आरोप याच स्वरुपाचे आहेत. चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांनी भ्रमणध्वनीवर संवाद साधल्याचे सांगितले जाते. राजाभाऊ यांचे कौतुक करीत तुम्ही त्याची जबाबदारी आमच्यावर सोपवा, पुढील २०२९ च्या निवडणुकीची काळजी करू नका, अशी साद घातली गेल्याची माहिती पुढे येत आहे. चर्चेत मागील निवडणुकीत झालेल्या कर्जाचा विषय निघाल्यावर राजाभाऊ वाजे यांना कर्जमुक्त करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आल्याचे सांगितले जाते. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मन परिवर्तनासाठी दोन ते तीन वेळा अथक प्रयत्न करण्यात आले. परंतु, तुम्ही चुकीच्या माणसांकडे आल्याचे सांगून त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी या विषयावर पडदा टाकला. या घटनाक्रमाची माहिती नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली गेली. तेव्हाही प्रकाश वाजे यांनी ‘आम्ही कुठे जाणार नाही, आमची काळजी करू नका’, अशी ग्वाही दिल्याची माहिती पुढे आली आहे.
