नाशिक : नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीच्या इतिहासात आणखी एक अध्याय लिहिला जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या आमसभेच्या (यूएनजीए) कामकाजासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १२ सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या प्रतिनिधी मंडळात सहभागी होणारे ते एकमेव खासदार आहेत.

५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या अधिवेशनाच्या विविध समित्या व संबंधित कामकाजात ते सहभागी होतील. संयुक्त राष्ट्रांची आमसभा ही जगातील १९३ सदस्य राष्ट्रांना एकत्र आणणारे प्रमुख बहुपक्षीय व्यासपीठ मानले जाते. जागतिक शांतता व सुरक्षा, आर्थिक व सामाजिक विकास, मानवाधिकार, आंतरराष्ट्रीय कायदा, दहशतवाद, शाश्वत विकास यांसह विविध प्रश्नांवर चर्चा आणि धोरणात्मक विचारविनिमय होतो.

खासदार राजाभाऊ वाजे यांच्या या निवडीला त्यांच्या संसदीय कामकाजातील सक्रिय सहभागाची दखल म्हणून पाहिले जाते. १८व्या लोकसभेत त्यांनी नाशिकच्या स्थानिक प्रश्नांपासून ते शेतकरी, कांदा उत्पादक, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि विकासाशी संबंधित विविध विषय सातत्याने मांडले आहेत. संसदीय कामकाजाच्या उपलब्ध नोंदीनुसार, त्यांनी आतापर्यंत १००हून अधिक प्रश्न उपस्थित केले असून, ३६ चर्चांमध्ये सहभाग नोंदविला आहे. या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी त्यांना मिळत आहे.

१२ खासदारांचे बहुपक्षीय प्रतिनिधित्व

या प्रतिनिधी मंडळात देशाच्या विविध भागांतील तसेच विविध राजकीय पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. राजस्थान, त्रिपुरा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली आदी राज्यांचे प्रतिनिधित्व या समूहात आहे. नाशिकचे खासदार आता संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यासपीठावर पोहोचले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ८१व्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय कायदा, दहशतवाद, प्रशासन, विकास आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर विविध समित्यांचे कामकाज सुरू आहे.

 ‘सन्मान व तितकीच मोठी जबाबदारी’

संयुक्त राष्ट्रांची आमसभा हे जगातील १९३ देशांना एका व्यासपीठावर आणणारे अत्यंत महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ आहे. अशा व्यासपीठावरील कामकाजासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १२ सदस्यीय संसदीय प्रतिनिधी मंडळात माझी निवड होणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. भारताचा लोकप्रतिनिधी म्हणून या जागतिक व्यासपीठावरील विचारमंथन, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विविध देशांच्या अनुभवांचा जवळून अभ्यास करून, त्याचा उपयोग नाशिक आणि देशाच्या विकासासाठी करण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी भावना खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली.