नाशिक : भरती प्रक्रिया सुधारणांसाठी सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय गटाने बुधवारी नाशिक विभागातील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना थेट आपले म्हणणे गटासमोर मांडण्याची संधी मिळाली. कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची प्रथम नोंदणी करण्यात आली. सभागृहात प्रवेश देताना पोलिसांकडून प्रत्येकाची अंगझडती घेण्यात आली. काही विद्यार्थ्यांच्या खिशात शाईचा पेन आढळल्याने ते बाहेर काढून घेतल्यानंतर त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला.

राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय गटाच्या संवाद कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीनंतर राज्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली होती. त्यामुळे या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून आले.

उच्चस्तरीय गटाच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, सदस्य तथा पोलीस महासंचालक सदानंद दाते, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित भोसले (निवृत्त), माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षांबाबतचे अनुभव, अडचणी आणि अपेक्षित सुधारणा मांडण्याची थेट संधी मिळणार असल्याने विद्यार्थी सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी दाखल होऊ लागले. काही विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, तर काहींसोबत खासगी क्लासेसचे शिक्षकही आले होते. विद्यार्थ्यांची सभागृहाबाहेरील कक्षात नोंदणी करून त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले. या क्रमांकानुसार १० ते २० विद्यार्थ्यांच्या गटांना नियोजन भवन सभागृहात प्रवेश देण्यात आला.

उर्वरित विद्यार्थ्यांना सभागृहाबाहेरील मंडपात बसवण्यात आले होते. या ठिकाणी सभागृहातील संवाद ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना सभागृहात प्रवेश देण्यात येत होता. त्यापूर्वी संबंधितांची झडती घेतली जात होती. यावेळी काही विद्यार्थ्यांकडे शाईची पेन असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ते काढून घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. तपासणीदरम्यान बॉलपेन मात्र काढून घेतले गेले नसल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. सभागृहात भ्रमणध्वनीवरून व्हिडिओ चित्रित करण्यास मनाई करण्यात आली होती. याबाबतची स्पष्ट सूचना विद्यार्थ्यांना आधीच देण्यात आली होती, असे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.

‘कोणीही नाराज नाही’

संवाद कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील रोष कमी झाला का, असा प्रश्न उच्चस्तरीय गटाच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘तुम्हीच सांगा,’ असा प्रतिप्रश्न करीत राज्यातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणीही नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उच्चस्तरीय गटातील अधिकारी हे एमपीएससीच्या व्यवस्थेपेक्षा वेगळे आणि तटस्थ असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आमच्यावर विश्वास आहे, असेही राधा यांनी सांगितले. भंडारा, गोंदिया, कोकण आदी भागांतील विद्यार्थ्यांनीही या संवादात सहभागी होत भरती परीक्षा आणि प्रक्रियेत बदल करण्यासाठी आपले म्हणणे मांडले. सध्याची पिढी स्मार्ट असून बदल घडवण्यासाठी ती उत्सुक असल्याचे राधा यांनी नमूद केले.