नाशिक – महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी कृती समितीच्या वतीने नाशिकरोड येथील महावितरणच्या परिमंडळ कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी द्वारसभा घेण्यात आली. महाराष्ट्रातील वीज उद्योगातील १७ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आयोजित केलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी भर पावसात सहभागी झाले.

राज्यातील महत्वाच्या सेवांपैकी वीज सेवा मानली जाते. रात्रंदिवस ही सेवा द्यावी लागत असल्याने कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड ताण असतो. अनेक वेळा काही कारणाने सेवा विस्कळीत झाल्यास जनतेचा रोष कर्मचारी, अभियंत्यांना सहन करावा लागतो. तरीही अधिकाधिक चांगली सेवा कशी देता येईल, यासाठी कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत असतात. असे असतानाही त्यांच्या अनेक मागण्यांविषयी कोणताही निर्णय होत नसल्याने त्यांच्यामध्ये असंतोष आहे.

तीनही वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर अद्याप समाधानकारक निर्णय न झाल्याच्या निषेधार्थ ही द्वारसभा आयोजित करण्यात आली. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार युनियन (५०५९), महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन (इंटक), ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन, राष्ट्रवादी वीज कामगार काँग्रेस, महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर संघटना, वीज निर्मिती कामगार संघटना, फायनान्स अँड अकाउंट एम्प्लॉईज युनियन, क्रांतिकारी लाईनस्टाफ सेना, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कार्यालयीन कर्मचारी-अधिकारी संघटना आणि युनियन ऑफ केमिस्टसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

सभेला किरण जाधव, दीपक गांगुर्डे, सचिन पवार, हर्षद काटे, सुरेश पाचंगे आणि राजू पठाण यांनी मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. द्वारसभेचे सूत्रसंचालन महेश कदम यांनी केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.