नाशिक – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) नुकसानीला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत मुख्यालयातून नाशिक विभागातील ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश निघाले आणि याची कुणकुण लागताच हे आदेश हाती पडण्याआधीच संबंधित सर्व अधिकारी कार्यालयातून अंतर्धान पावले. शुक्रवारीदेखील ते कार्यालयात अनुपस्थित होते. परवानगी न घेता संबंधितांनी रजा घेतल्याचे सांगितले जाते. एकाच वेळी ११ प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे नाशिक विभागाचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. संबंधितांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे

गेल्या जून महिन्यात महामंडळाचे व्यवस्थापक तथा नियंत्रण अधिकारी वीरेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखालील समितीने नाशिक विभागातील प्रति किलोमीटर उत्पन्न आणि प्रति किलोमीटर खर्च यांचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौरा केला होता. तेव्हा नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष, वाहनांच्या प्राथमिक नोंदी न ठेवणे, नादुरुस्त वाहने कार्यान्वित न करणे आदी अनेक मुद्यांवर बोट ठेवत समितीने एसटी महामंडळाचा तोटा वाढविण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी हातभार लावल्याचा ठपका अहवालात ठेवला होता. हा अहवाल सादर झाल्यानंतर एकाच वेळी ११ बड्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. यामध्ये एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातील प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, यंत्र अभियंता पंकज महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, वरिष्ठ आगार व्यवस्थापक (पंचवटी) सौरभ देवरे, लेखा अधिकारी निलीमा विसपुते, विभागीय लेखा अधिकारी संजय गायधनी, विभागीय भांडार अधिकारी अमोल वाघ, विभागीय कर्मवर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण, विभागीय अभियंता चैताली भुसारे, आगार व्यवस्थापक (इगतपुरी) प्रणव अहिरे यांचा समावेश आहे. मुख्यालयातून निलंबनाचे आदेश निघाल्याची माहिती समजताच हे बडे अधिकारी कार्यालयातून अंतर्धान पावल्याचे सांगितले जाते.

निलंबनाचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले. परंतु, ते गैरहजर होते. अनेक जण वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याचे बोलले जाते. यातील अनेकांनी रजेसाठी अर्ज केलेला नाही. त्यांची रजा मंजूर नसतानाही ते गैरहजर असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. या कारवाईने संबंधितांच्या कार्यालयातील कर्मचारी धास्तावले असून तेही सुट्टीवर गेल्याचे सांगितले जाते. यामुळे संबंधितांच्या कार्यालयात काहिसा शुकशुकाट जाणवत आहे. निलंबनाचे आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे देण्याची कार्यवाही पार पाडली जाईल, असे नाशिक विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

१३ आगार, ८५० एसटी बस…

निलंबित झालेल्यांमध्ये प्रादेशिक अभियंता, विभाग नियंत्रक, वाहतूक, लेखा, भांडार विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच दोन आगार व्यवस्थापकांचा समावेश आहे. नाशिक विभागात एकूण ८५० एसटी बस असून, १३ आगारांमधून प्रवासी वाहतुकीचे काम चालते. एकाच वेळी ११ अधिकारी निलंबित झाल्यामुळे एसटीच्या दैनंदिन कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचा दावा वरिष्ठांनी केला. ११ अधिकारी निलंबित झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियोजन व व्यवस्थापन केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.