नाशिक – चालक-वाहक व वाहनांच्या योग्य वापराबाबत नियोजनाचा अभाव, अभिलेख (रेकॉर्ड) न ठेवणे वा अर्धवट ठेवणे, दिशाभूल करणाऱ्या नोंदी, नुकसानीस प्रतिबंध करण्याकडे दुर्लक्ष, गैरवर्तन व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करणे आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय करणे अशा कृतीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत नाशिक विभागातील प्रादेशिक अभियंता, विभाग नियंत्रकासह ११ बड्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने प्रमुख अधिकारी निलंबित करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिक विभागातील प्रति किलोमीटर उत्पन्न आणि प्रति किलोमीटर खर्च यांचा आढावा घेण्यासाठी जून महिन्यात महामंडळाचे व्यवस्थापक तथा नियंत्रण अधिकारी वीरेंद्र कदम यांनी सांख्यिकी व नियोजन नियोजन अधिकाऱ्यांसमवेत इगतपुरी आणि नाशिक – दोन आगारास प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यावेळी अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. या संदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना सादर झालेल्या अहवालावरून एकाचवेळी ११ बड्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातील प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, यंत्र अभियंता पंकज महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, वरिष्ठ आगार व्यवस्थापक (पंचवटी) सौरभ देवरे, लेखा अधिकारी निलीमा विसपुते, विभागीय लेखा अधिकारी संजय गायधनी, विभागीय भांडार अधिकारी अमोल वाघ, विभागीय कर्मवर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण, विभागीय अभियंता चैताली भुसारे, आगार व्यवस्थापक प्रणव अहिरे यांचा समावेश असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करून या सर्व अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विभागाचा तोटा मोठ्या प्रमाणात होईल या दृष्टीने कामकाज केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
इगतपुरी बस स्थानक आणि नाशिक दोन आगाराच्या तपासणीदरम्यान नाशिक विभागाचे कामकाज हे अत्यंत निष्काळजीपणे व बेफिकीर वृत्तीने सुरू आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची गंभीर दखल न घेता अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याकडे अहवालातून लक्ष वेधण्यात आले. पाहणी दरम्यान समोर आलेल्या बाबींवरून या अधिकाऱ्यांची गैरशिस्त, कामचुकारपणा, हलगर्जीपणावर बोट ठेवण्यात आले. विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी आगारास नियमितपणे भेटी देऊन वाहतुकीची फलनिष्पत्ती तसेच बस स्थानक व्यवस्थापन याची तपासणी केली नाही, आगार स्तरावर इश्यू आणि स्टार्ट कार्यपद्धतीच्या अवलंबाबत पडताळणी न करणे, आगार भेटीत फेऱ्यांच्या नोंदींची तपासणी केली नाही. फेऱ्या उशिराने धावल्याने प्रवासी खोळंबा होऊन उत्पन्न बुडते. महामंडळाचे नुकसान होते. प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे यांच्या अकार्यक्षमतेमुळे महामंडळाची आर्थिक हानी झाल्याची निरीक्षणे नोंदवली गेली आहे. सोनवणे हे सुरूवातीपासून ठरावीक ठिकाणीच कार्यरत आहेत. चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण देण्यात त्यांना स्वारस्य आहे. वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजण्यात ते अपयशी ठरले. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे महामंडळाची आर्थिक नुकसान झाल्याची निरीक्षणे अहवालात नोंदवण्यात आली आहे.
तोटा वाढविण्यास हातभार
वाहनांचे बेसिक रेकॉर्ड ठेवणे, चालक वाहनांच्या हजेरीवर नियंत्रण, अतिकालीन भत्ता नियंत्रणात ठेवणे, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रवाशांना मूलभूत सुखसोयी व सुविधा उपलब्ध करणे, खर्चावर नियंत्रण ठेवून प्रति किलोमीटर खर्च कमी करणे, उपलब्ध रजिस्टरवर वेळोवेळी नोंदी करणे, बस स्थानके, नियंत्रण कक्ष व आगारांची वेळोवेळी तपासणी करून आढळलेल्या त्रुटींची दखल घेऊन पूर्तता करणे, नादुरुस्त वाहने वेळीच कार्यान्वित करणे, स्थानिक खरेदी कमी करणे, नियम पाळण्यात अपयशी ठरलेल्यांची नोंद करून कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, लेखा शाखेने खर्चावर वेळोवेळी नियंत्रण ठेवणे व वारंवार तपासणी करणे या बाबींकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विभागाचा तोटा वाढविण्यास हातभार लावल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
