नाशिक – सोमवारी गणेशोत्सवास सुरुवात होत असताना कोकणातील गणेशोत्सवाचे अप्रूप सर्वांनाच आहे. चाकरमान्यांना गावाकडे जाता यावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नियोजन सुरू असून, या नियोजनाचा फटका नाशिक विभागाला बसला आहे. नाशिकमधून काही बस कोकणातील गणेशोत्सवासाठी पाठवण्यात आल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबत प्रवाशांना पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा झाला.
सर्वांच्या लाडक्या गणेशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. अगदी दीड दिवसांच्या गणपतीपासून ते ११ दिवसांच्या मुक्कामापर्यंत गणरायाचे आगमन घरोघरी होणार आहे. नोकरी, कामधंद्यामुळे गावापासून दुरावलेल्या नोकरदारांसाठी गणेशोत्सव हा गावाशी जोडलेली नाळ कायम ठेवणारा उत्सव आहे. मुंबई, पुण्याच्या गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणातील गणेशोत्सव खास ठरतो. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने या अनुषंगाने खास नियोजन करण्यात आले असून, जादा बस या गणेशोत्सवासाठी सोडण्यात आल्या आहेत.
नाशिक विभागाचा विचार करता, नाशिकमधून ३४ बस या उत्सवासाठी मुंबईकडे पाठवण्यात आल्या आहेत. याचा अप्रत्यक्ष फटका स्थानिक प्रवाशांना बसला आहे. बस मुंबईकडे गेल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये लातूर, भगवानगड, बीड, पंढरपूर, स्वारगेटकडील बससेवेतील काही फेऱ्या कमी झाल्या आहेत. प्रवाशांना याविषयी पूर्वकल्पना नसल्याने त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला.
याविषयी बोलताना वैष्णवी कुलकर्णी या युवतीने सांगितले, ‘मी एका कंपनीत काम करते. घरी तीन दिवसांचा गणपती असतो. ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा घेत पुण्याला घरी जाण्याचे नियोजन केले होते. गणपती काळातील गर्दी पाहता सकाळपासून बसस्थानकावर होते. मात्र, स्वारगेटकडे जाणाऱ्या फेऱ्या कमी झाल्याने बसची वाट पाहावी लागत आहे.’
हाच अनुभव लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही आला. महामंडळाच्या वतीने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात न आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. प्रवाशांची गर्दी बसस्थानक परिसरात कायम राहिली. शुक्रवारी दुपारपासून निर्माण झालेली ही परिस्थिती रविवारी रात्री उशिरापर्यंत कायम राहिली.
१२ हजार किलोमीटरचा प्रवास रद्द
नाशिक विभागातून ३४ बस शुक्रवारपासून मुंबई येथील गणेशोत्सवासाठी पाठवण्यात आल्या आहेत. या ३४ बस नाशिक विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी ७० फेऱ्या मारणार होत्या. मात्र, त्या बस तिकडे पाठवल्याने १२ हजार किलोमीटरचा प्रवास रद्द झाला असून, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला.
सोमवारपासून बससेवा पूर्ववत
‘शुक्रवारी ३४ बस मुंबई येथे कोकण गणेशोत्सव सेवेसाठी पाठवण्यात आल्या. शनिवार आणि रविवारपर्यंत या बस नाशिक येथे परत येतील. सोमवारपासून बससेवा पूर्ववत होईल. या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.’ – हेमंत नेरकर, आगार व्यवस्थापक, नाशिक विभाग क्रमांक १
