नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) नाशिक विभागातील प्रमुख पदांवरील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, गैरशिस्त, हलगर्जीपणा आदींवर बोट ठेवत निलंबित केलेल्यांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे. एकाच वेळी इतके अधिकारी निलंबित झाल्याने कामकाजात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महामंडळाने या सर्व पदांचा अतिरिक्त कार्यभार तातडीने काही स्थानिक अधिकाऱ्यांसह अहिल्यानगर, धुळे आणि बुलढाणा विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपवला. मात्र, या आदेशातून वेगळाच गोंधळ समोर आला असून, निलंबित झालेल्या एका अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वीच निलंबित असलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा प्रकार घडला.
प्रतिकिलोमीटर उत्पन्न आणि प्रतिकिलोमीटर खर्चाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे एसटीच्या नाशिक विभागातील १२ अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. निलंबित झालेल्यांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने नाशिक विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या विभागात एकूण १३ आगारे असून सुमारे ८५० बसचे व्यवस्थापन केले जाते. निलंबित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी संबंधित पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविला.
त्यानुसार निलंबित प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे यांचा अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक अभियंता अशोक पन्हाळकर यांच्याकडे, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांचा अतिरिक्त कार्यभार अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्याकडे, यंत्र अभियंता पंकज महाजन यांचा अतिरिक्त कार्यभार उपयंत्र अभियंता प्रसाद देसाई यांच्याकडे, यंत्र अभियंता नितीन जैसवाल यांचा अतिरिक्त कार्यभार बुलढाणा विभागातील उपयंत्र अभियंता विनोद इलामे यांच्याकडे, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांचा अतिरिक्त कार्यभार विभागीय वाहतूक अधिकारी कल्याणी ढगे यांच्याकडे, नाशिक आगार क्रमांक दोनचे आगार व्यवस्थापक सौरभ देवरे यांचा अतिरिक्त कार्यभार सौरभ रत्नपारखी यांच्याकडे, लेखा अधिकारी निलीमा विसपुते यांचा अतिरिक्त कार्यभार धुळे विभागातील लेखा अधिकारी मिलिंद सांगळे यांच्याकडे, लेखा अधिकारी संजय गायधनी यांचा अतिरिक्त कार्यभार धुळे विभागातील अल्पेश सोलंकी यांच्याकडे, विभागीय भांडार अधिकारी यांचा अतिरिक्त कार्यभार भांडार पर्यवेक्षक मधुकर गरड यांच्याकडे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अश्विनी चौहान यांचा अतिरिक्त कार्यभार कामगार अधिकारी कमलेश भावसार यांच्याकडे, कनिष्ठ अभियंता चैताली भुसारे यांचा अतिरिक्त कार्यभार नीलेश बोरकर यांच्याकडे आणि इगतपुरी आगार व्यवस्थापक प्रणव अहिरे यांचा अतिरिक्त कार्यभार विभागीय वाहतूक अधीक्षक स्मिता मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आदेशातच मोठी चूक
निलंबित अधिकाऱ्यांच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविताना एका प्रकरणात मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये नाशिक आगार क्रमांक दोनचे आगार व्यवस्थापक सौरभ देवरे यांचा समावेश आहे. त्यांचा अतिरिक्त कार्यभार याच आगाराचे सौरभ रत्नपारखी यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र, आगार व्यवस्थापक सौरभ रत्नपारखी यांच्यावर विभागीय स्तरावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे महामंडळाने एका निलंबित अधिकाऱ्याच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्याच निलंबित अधिकाऱ्याकडे सोपवल्याचे स्पष्ट झाले.
मुख्यालय करणार दुरूस्ती
मुख्यालयातून आदेश प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. आगारप्रमुख सौरभ रत्नपारखी यांच्यावर विभागीय स्तरावर आधीच निलंबनाची कारवाई झाली होती. या संदर्भातील माहिती मुख्यालयाकडे उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा आदेश निघाला. विभागीय स्तरावरून ही बाब मुख्यालयाला कळविण्यात आली असून, नाशिक आगार क्रमांक दोनबाबतच्या आदेशातील त्रुटी लवकरच दुरुस्त केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, इगतपुरी आगाराचा अतिरिक्त कार्यभार देतानाही महामंडळाकडून चूक झाल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून आजारपणामुळे गैरहजर असलेल्या महिला अधिकाऱ्याकडे इगतपुरी आगाराचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. या आदेशातही मुख्यालयाकडून दुरुस्ती केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
