नाशिक – सध्याचे जीवन धकाधकीचे झाल्याने नोकरदार मंडळींना आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही. हेच हेरुन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आपल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी एक उपक्रम आखला. ’रक्तविकार, आहार व उपचार’ विषयावर विशेष कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद् घाटन समारंभास विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, रक्तविकार व कर्करोग (कॅन्सर) तज्ज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे व्यासपीठावर उपस्थित होते.
स्पर्धेच्या युगात थांबून कोणालाही चालत नाही. त्यामुळे प्रत्येक जण दररोजचे आपले जे काम आहे, ते काहीही झाले तरी पूर्ण करण्यामागे लागतो. या कामासाठी देण्यात येणारा वेळ, परिश्रम आणि धावपळ यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्याचे दुष्परिणाम जाणवण्यास कालांतराने सुरुवात होते. हेच हेरुन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे कार्यशाळा घेण्यात आली.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रसिध्द रक्तविकार व कॅन्सर तज्ज्ञ डॅा. प्रितेश जुनागडे यांनी सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या आहारपध्दतीमुळे रक्तक्षय आणि इतर रक्तविकारांचे प्रमाण वाढत आहे. योग्य आहार आणि वेळेवर केलेली तपासणी याद्वारे अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. धावती जीवनशैली, मोबाईल व संगणकाचा वाढत्या वापरामुळे व्यायामाचा अभाव होत आहे त्यासाठी सर्वांनी योग्य दिनचर्या पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वत्र वाढते प्रदुषण आणि अन्नातील भेसळीमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत असल्याचेही डाॅ. जुनागडे यांनी सांगितले. त्यामुळे या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी सर्वांनी सजगता बाळगावी. व्यसनाचे वाढते प्रमाण, निद्रानाश व मानसिक आजार यावर प्रतिबंध आणण्यासाठी सामाजिक जागरुकता वाढणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अनुवंशिक आजारांबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांचे निराकरण होणे गरजेचे असल्याचे डाॅ. जुनागडे यांनी मांडले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी, आरोग्य, आहार व व्यायम यावर सर्वांनी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. आरोग्य विषयक तज्ज्ञांच्या व्याख्यानांमुळे आरोग्य विद्यापीठातील कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रती नवी जागरुकता निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड यांनी, आपला नियमित आहार संतुलित असावा, असे सांगितले.
रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी फळे व हिरव्या पाल्याभाज्यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश असावा. आरोग्याकडे वेळीच लक्ष दिल्यास भविष्यातील मोठे धोके टाळता येतात, असे त्यांनी सुचविले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा काळे यांनी केले. या कार्यशाळेकरीता गायत्री चौधरी, मानसी हिरे, गणेश आढाव, आप्पासाहेब खांडेलकर, मनोहर गवळी, अनिल पावरा यांनी परिश्रम घेतले.
