नाशिक – शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन महिला संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. न्यायालयाने पाच संशयितांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

​बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांविषयक असे प्रकार घडल्याने गांभीर्य वाढले आहे. या कारवाईची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. साधारणतः २०२२ ते २०२६ या कालावधीत हे गुन्हे घडले. यातील एक गुन्हा लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषणाचा आहे, तर एक गुन्हा धर्म परिवर्तनाच्या प्रयत्नाचा आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक अर्थात ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. तक्रारदारांमध्ये आठ महिला तर एका युवकाचा समावेश आहे. या युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले.

​गुन्ह्यांचे स्वरूप…

​पहिला गुन्हा

जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील तीन सहकाऱ्यांनी पीडितेला विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावल्या. एका संशयिताने लग्नाचे वचन देऊन पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच अन्य एकाने कार्यालयात, जिन्यात पकडून पीडितेशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे.

​दुसरा गुन्हा

मे २०२३ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत कंपनीतील दोन सहकाऱ्यांनी पीडितेकडे रोखून पाहिले, स्पर्श करून वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबाबत लज्जास्पद टिप्पणी केली. या संदर्भात पीडितेने कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या. त्यांनी तक्रारदाराच्या विनयभंगाच्या तक्रारीची दखल न घेता संशयितांच्या कृत्याला चिथावणी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.

​तिसरा गुन्हा

२०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान कंपनीच्या बैठकीत एका संशयिताने एकटक महिला तक्रारदाराकडे पाहिले. वैवाहिक आयुष्यात संतती नसल्याबाबत लज्जास्पद बोलून, पकडून लैंगिक जवळीक साधण्यासाठी तक्रारदाराला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

​चौथा गुन्हा

मे २०२५ ते डिसेंबर २०२५ या दरम्यान कंपनीतील एका संशयित कर्मचाऱ्याने तक्रारदाराशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने खासगी आयुष्याविषयी लज्जास्पद गोष्टी विचारल्या. तसेच गैरवर्तन केले. विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून तक्रारदारासह अन्य सहकाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

​पाचवा गुन्हा

२०२२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तीन संशयितांनी विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून पुरुष तक्रारदाराला त्यांच्या धर्माची प्रार्थना करायला भाग पाडले. विशिष्ट धर्माचा अपमान केला. तक्रारदाराला बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावून त्याचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. विशिष्ट धर्मातील महिलांबाबत अश्लील शब्द आणि शेरेबाजी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.

​सहावा गुन्हा

सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या दरम्यान बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या दोन संशयितांनी तक्रारदाराच्या शरीरावरून अश्लील टिप्पणी केली. जाणीवपूर्वक स्पर्श करून तक्रारदाराच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सातवा गुन्हा

जून २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान नामांकित कंपनीत पाच संशयितांनी महिला तक्रारदाराचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करणे, स्पर्श करणे व अश्लील नजरेने पाहून विनयभंग केला. तसेच विशिष्ट धर्माविषयी अपशब्द बोलून धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

​आठवा गुन्हा

जानेवारी २०२५ ते आतापर्यंत कंपनीत एका संशयिताने महिला तक्रारदाराची इच्छा नसताना शारीरिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराच्या खासगी आयुष्याबाबत वेळोवेळी बोलून तिची इच्छा नसताना प्रस्ताव मांडला. दुसऱ्या संशयिताने शरीराविषयी अश्लील टिप्पणी केली. दोन्ही संशयित अंगलगट करायचे.

​नववा गुन्हा

जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या दरम्यान दोन संशयितांनी तक्रारदार महिलेसोबत अश्लील पद्धतीने भाष्य करून अश्लील चाळे केले. महिला तक्रारदाराची इच्छा नसताना तिच्या खासगी आयुष्याबाबत वारंवार विचारणा करून तिच्यावर नजर ठेवली. शरीरावरून अश्लील टिप्पणी करून तक्रारदाराच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.