नाशिक: देशातील विविध भागांतून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या ६० लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. या सर्व रेल्वेगाड्या सरासरी ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगाने धावतात. मात्र, मध्य रेल्वेच्या नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावरील अस्वली-पाडळी दरम्यान ताशी ७५ किलोमीटर वेगमर्यादेचे निर्बंध होते. भुसावळ विभागाने ‘थ्रू फॉर्मेशन ट्रीटमेंट’ (टीएफटीआर) यशस्वीरीत्या पूर्ण करून ही वेगमर्यादा कायमस्वरूपी हटवली आहे. यामुळे नाशिकमार्गे मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक गाडीची आता ३ मिनिटे वाचतील आणि गाड्या वेळेत मुंबईला पोहोचण्यास मदत होईल.

​मध्य रेल्वेच्या नाशिक-मुंबई मार्गावर पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, आसाम या राज्यांसह नागपूर, अमरावतीहून येणाऱ्या गाड्या मार्गस्थ होतात. दिवसभरात या मार्गाने मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या ६० आहे. प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देणे, सुरक्षितता वाढवणे आणि रेल्वेचा वेग वाढवणे या उद्देशाने पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यावर मध्य रेल्वेचा भर आहे. ​त्याअंतर्गत भुसावळ विभागाने अस्वली-पाडळी विभागातील मार्गावर अत्यंत आव्हानात्मक असे ‘थ्रू फॉर्मेशन ट्रीटमेंट’ (टीएफटीआर) काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. १६०.५७० ते १६०.१३७ किलोमीटर या अंतरादरम्यानच्या ८०० मीटर लांबीच्या पट्ट्यावर गेल्या अनेक काळापासून ७५ किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा लागू होती. विशेषतः पावसाळ्यात या पट्ट्यावर सातत्याने देखरेख ठेवणे आवश्यक असे.

हा विभाग घाट क्षेत्रात असल्याने आणि तिथे पोहोचण्याचे मार्ग मर्यादित असल्याने हे काम पूर्ण करणे अत्यंत आव्हानात्मक होते. येथील रेल्वे रुळांच्या पायाची उंची अंदाजे नऊ मीटर असून, त्यात २.२६ अंशांचा एक वळणदार भागही आहे. हे सर्व लक्षात घेऊन हे काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. ‘टीएफटीआर’चे काम ‘कट अँड कव्हर’ पद्धतीने करण्यात आले. यासाठी चार उत्खनन यंत्रे, दोन जेसीबी, तीन क्रेन, रोलर आणि पाण्याचे टँकर्स वापरण्यात आले. ही संपूर्ण मोहीम ३३ ‘ट्रॅफिक ब्लॉक्स’मध्ये पूर्ण करण्यात आली. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंता पथकासह ३५ कर्मचाऱ्यांच्या बळावर हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाला.

​नियोजित वेळेत मुंबई गाठण्यास मदत

‘टीएफटीआर’चे काम यशस्वी झाल्यामुळे अस्वली-पाडळी दरम्यानची वेगमर्यादा कायमची हटली आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीचा वेग वाढण्यासोबतच या विभागातील रेल्वे संचलनाची सुरक्षाही लक्षणीयरीत्या वाढणार आहे. मुंबई विभागात प्रवेश केल्यानंतर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या एकाच मार्गावरून धावतात. अशा वेळी भुसावळ विभागात वाचलेली ३ मिनिटे लांब पल्ल्याच्या गाड्यांना नियोजित वेळेत मुंबईत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.