नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात एकाच वेळी हाती घेण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्ते व अन्य कामांच्या दर्जावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी खुले आव्हान दिले. कुंभमेळ्याच्या कामात तांत्रिक अथवा बांधकामाच्या दर्जाबाबत चूक दाखवून दिल्यास आपण आपले नाव बदलू, अशा शब्दांत खत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने जवळपास २८ प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह हजारो कोटींची विविध कामे प्रगतीपथवर आहेत. एकाच वेळी रस्त्याची कामे सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. खोदकाम, खड्डे व चिखलमय रस्त्यांमुळे लहान-मोठे अपघात घडत असून काहींना प्राण गमवावे लागले, तर कित्येक जण जायबंदी झाले. या स्थितीवरून नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त होत असून रस्त्यांसह कुंभमेळ्याशी संबंधित कामांच्या गुणवत्तेबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियातून महापालिकेवर टीकेचा भडिमार होत आहे.

त्र्यंबक नाका परिसरातील रस्त्यांच्या कामांची आयुक्त मनिषा खत्री यांनी पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या बांधकामाची पद्धत, वापरलेले साहित्य, काँक्रिटची जाडी आणि निर्धारित तांत्रिक निकषांची पूर्तता याविषयी त्यांनी माहिती घेतली. रस्त्यांची गुणवत्ता आणि दर्जाबाबत होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना खत्री म्हणाल्या, मनपा आयुक्त म्हणून माझे सर्वांना एक ओपन चॅलेंज आहे. आमचे जेवढे निविदा कागदपत्रे (टेंडर डॉक्युमेंट्स) आहेत, ते सर्व ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध केले जात आहेत. ज्यांना जे काही तपासायचे आहे, त्यांनी ते तपासावे आणि आमची चूक दाखवून द्यावी. कुंभमेळ्यातील कामाचा दर्जा किंवा गुणवत्तेत कोणतीही तडजोड केलेली नाही. कामावर अत्यंत कडक नियंत्रण ठेवले जात असून, सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर माझी सर्वांना ही खुली आव्हानात्मक भूमिका आहे. या कामात एक जरी चूक दाखवून दिली, तर मी माझे नाव बदलेन. असे आव्हान खत्री यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिले.

तांत्रिक गुणवत्तेची खात्री करूनच बिले

शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेची चार स्वतंत्र संस्थांकडून तपासणी केली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. काँक्रिट रस्त्यांच्या तपासणीसाठी आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी शहरातील तीन प्रमुख काँक्रिट रस्त्यांची पाहणी करून कोअर कट पद्धतीने काँक्रिटची प्रत्यक्ष जाडी तपासली. प्राथमिक तपासणीत कामे निर्धारित तांत्रिक मानकांनुसार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. याबाबतची स्पष्टता तज्ज्ञांच्या अहवालानंतरच होणार आहे. हा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित ठेकेदारांची बिले अदा केली जाणार नाहीत. केवळ काम पूर्ण झाल्याच्या आधारावर देयके न देता तांत्रिक गुणवत्तेची खात्री केल्यानंतरच देयके देण्याचे महापालिकेने ठरवले आहे.