नाशिक – महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी माघार घेतल्याने निवडणूक टळली. महापौरपद मराठा समाजाला दिल्यानंतर भाजपने महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या सर्वात महत्वाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी ओबीसी घटकाला संधी देऊन ’सोशल इंजिनिअरिंग‘चा प्रयोग पुढे नेला आहे.

स्थायी समिती सभापतीपदासाठी बुधवारी पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. या प्रक्रियेपासून प्रसारमाध्यमांना दूर ठेवले गेले. स्थायी सभापती पदासाठी भाजपतर्फे मच्छिद्र सानप आणि अजित पवार गटाचे सहयोगी अपक्ष सदस्य मुकशे शहाणे असे दोन जणांनी अर्ज भरलेले होते. माघारीसाठी दिलेल्या मुदतीत शहाणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. या निवडीनंतर त्यांनी स्थायी सभापती सानप यांचे अभिनंदन केले.

यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानी फरांदे, म्हाडाचे विभागीय अध्यक्ष रंजन ठाकरे, भाजप गटनेते शाम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. निवड झाल्यानंतर सानप यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मागील कुंभमेळा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाला होता. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळा विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराचा विकास या दृष्टीकोनातून काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे स्थायी सभापतीपदास महत्व प्राप्त झालेले आहे. वित्तीय अधिकार असणारी ही समिती आहे. या पदासाठी भाजपमध्ये स्पर्धा होती. पक्षाने शिवसेना शिंदे गटाला पालिकेतील सत्तेत सामावून घेताना उपमहापौरपद बहाल केले. उपमहापौर पदासाठी अर्ज भरणारे मच्छिंद्र सानप यांनी पक्षाच्या आदेशानुसार तेव्हा माघार घेतली होती. त्याचे फलित स्थायी सभापतीत झाले. भाजपकडून पालिकेत सामाजिक अभिसरणाचा (सोशल इंजिनिअरिंग) प्रयोग होत आहे.

नाशिकचे महापौरपद हिमगौरी आहेर-आडके यांच्या माध्यमातून मराठा समाजाकडे गेल्यानंतर स्थायी सभापतीपदासाठी ओबीसी घटकाचा प्राधान्याने विचार करण्यात आला. सानप हे वंजारी समाजाचे आहेत. पालिकेतील इतर महत्वाच्या पद वाटपात सर्व समाज घटकांना संधी दिली जाणार असल्याचे पदाधिकारी सांगतात. स्थायी सभापतीपद सव्वा वर्षासाठी ठेवून सर्वांना न्याय देण्याचा पक्षाच्या वरिष्ठांचा विचार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, महापौर पदापाठोपाठ भाजपने स्थायी सभापती पदाच्या निवडणुकीत घराणेशाहीची परंपरा जोपासल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थायी सभापतीपदी मच्छिंद्र सानप यांचे वडील बाळासाहेब सानप हे माजी आमदार व माजी महापौर आहेत.

अजित पवार गट बेदखल…

महापालिका निवडणूक निकालानंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटाप्रमाणे स्वतालाही सत्तेत वाटा मिळावा म्हणून धडपड केली. त्यांचे अपक्ष सहयोगी सदस्य मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज त्याचाच भाग होता. परंतु, स्थायीत बहुमतात असणाऱ्या भाजपने अजित पवार गटाची दखल घेतली नाही. अखेरीस त्यांच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली.