नाशिक – नाशिक शहरात वाढलेली मांजरांची संख्या आणि त्यामुळे होणारा त्रास, त्याविषयी महापालिकेकडे होत असलेल्या तक्रारी, याविषयी नाशिक महापालिकेने गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यामुळेच अशा त्रासदायक मांजरांपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि मांजरांची संख्या मर्यादित राहावी, यासाठी नाशिक महापालिकेकडून एक योजना आखण्यात आली आहे. या योजनेला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मांजर हा असा प्राणी आहे, जो बहुतेकांना हवाहवासा वाटतो आणि नकोसाही. मांजरीच्या वेगवेगळ्या जाती आहेत. जगातील अनेक देशांमध्ये मांजर ही पाळीव प्राणी आहे. मांजरीला आपल्याकडे वाघाची मावशी असेही म्हणतात. मांजरीचे मुख्य भक्ष्य उंदीर, पक्षी, लहान प्राणी हे अते. मांजर दूध पिण्यात पटाईत आहे. मांजर जन्मतःपासून भांडखोर वृत्तीचे असतात. मांजरीण एकावेळी ३ ते ५ पिल्लांना जन्म देते. मांजरांची संख्या झपाट्याने वाढण्याचे हे एक कारण आहे.

मांजराची रात्रीची दृष्टी आणि गंध घेण्याची क्षमता विलक्षण आहे. पाळीव मांजरी घरभर कुठेही फिरतात. त्यांनी अंग झटकले की केस पडतात. त्यामुळे अनेकांना घरात मांजर नकोशी वाटते. याउलट, मांजर अंगावर खेळवणारेही अनेक जण आहेत. घरातील पाळीव मांजर घरातील सदस्यांच्या पायांना खेटते. लडिवाळपणा करते. मांजरीचे हे गुण काहींना आवडतात. मांजर जेव्हां असे करते, तेव्हां असे वाटते की, ती घरातील एक सदस्यच आहे. त्यामुळे आम्ही मांजर पाळली असल्याचे सांगणारे अनेक जण आहेत.

मांजरीचे आयुष्य १२ ते १७ वर्षांचे असते. परंतु, मांजरीची योग्य देखभाल असल्यास काही मांजरी १७ वर्षांपेक्षा अधिक काळही जगू शकतात. बाहेर फिरणाऱ्या मांजरीचे आयुष्य दोन ते सात वर्षांपर्यंत असते. त्यांना आजारपणासह अनेक धोके संभवतात. कधीकधी आपली पाळीव मांजर शेजाऱ्यांसाठी त्रासदायक ठरु शकते. तुमच्या मांजरीने आमच्या अंगणात, घरात घाण केली, अशा तक्रारी केल्या जातात. त्यामुळे भांडणेही होतात. नाशिक शहरात मांजरांच्या संख्येत झालेली वाढ, मांजराविषयीच्या त्रासामुळे होणाऱ्या तक्रारी, या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने मांजरांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या अभिनव योजनेला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होण्याची शक्यता आहे. मांजर निर्बिजीकरणासाठी ठेका देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, महापालिका त्यासाठी एका मांजरामागे २१८० रुपये इतका खर्च करणार आहे. शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, काॅलनी, इमारती, बाजारपेठा, मच्छी बाजार, मटण दुकाने यासह इतर सार्वजनिक ठिकाणी मांजराचा वावर अधिक प्रमाणवर दिसतो. अशा ठिकाणांहून मांजरीमुळे त्रासलेल्यांच्या तक्रारी महापालिकेकडे येतात. मांजरांकडून करण्यात येणारी घाण, अस्वच्छता यामुळे आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात, असे रहिवाशांचे म्हणणे असते.

अशा प्रकारच्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता, या तक्रारींवर उपाय म्हणून महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने निर्बिजीकरण करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेकडून त्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परिसरात त्रासदायक मांजरी असल्यास, त्यामुळे अधिक नुकसान होत असल्यास महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे ७०३०२०८७८७ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारची तक्रार प्राप्त होताच महापालिकेकडून संबंधित ठेकेदाराचे पथक कार्यवाही करेल.

श्वानापेक्षा मांजराची नसबंदी करणे अधिक क्लिष्ट आहे. मांजराची नसबंदी तांत्रिकदृष्टया अधिक गुंतागुंतीची असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी सांगितले. त्यामुळेच जिथे महापालिका भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी प्रतिश्वान १६५० रुपये खर्च करते, तिथे प्रतिमांजर हा खर्च २१८० रुपयांपर्यंत आहे. मांजर निर्बिजीकरणासाठी जाहीर निविदेव्दारे ठेका देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार वर्षभर जिथून तक्रारी येतील, त्या भागातील मांजरींना पकडणार आहेत.

मांजरांची संख्या नियंत्रित करुन उपद्रव कमी करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.नाशिक महापालिकेने जाहीर केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांनी तक्रार केल्यावर ठेकेदाराची माणसे संबंधित ठिकाणी पोहचतील. मांजर पकडण्यासाठी सापळा लावतील. सापळ्यात मांजर अडकल्यानंतर मांजराची नसबंदी करण्यात येईल. या योजनेसाठी महापालिकेकडून स्वतंत्रपणे निधीची तरतूद केली आहे. निर्बिजीकरणाची ही योजना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कधीही सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी दिली आहे.