नाशिक – गणेशोत्सवात गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांतर्गत पाच दिवसांत शहरात एकूण १७०७ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. तसेच सुमारे चार मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
गणेशोत्सव पर्यावरणस्नेही होण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेमार्फत अनेक वर्षांपासून मूर्ती दान उपक्रम राबविला जात आहे. शाडू मातीच्या मूर्तींची गणेशभक्तांनी स्थापना करण्यासाठी विभागीय कार्यालयात विक्रेत्यांना जागा उपलब्ध करण्यात आली होती. पीओपी मूर्तींचे घरात विसर्जन करता यावे म्हणून मोफत स्वरुपात अमोनियम बायकार्बोनेट पावडर उपलब्ध केली जात आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने व नदी पात्रांचे प्रदूषण होऊ नये म्हणूून राबविलेला मूर्ती दान उपक्रम आणि निर्माल्य संकलनास यंदाही गणेशभक्तांकडून प्रतिसाद मिळत आहे. विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव आणि निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश, निर्माल्य रथ यांची व्यवस्था केलेली आहे. पाच दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मूर्ती दान करुन आणि निर्माल्य जमा करून सहकार्य केल्याचे महापालिकेने म्हटले आहे. सहा विभागातून आतापर्यंत एकूण १७०७ मूर्तींचे संकलन करण्यात आले. तसेच, सहा विभागातून विविध विसर्जन स्थळांवरून ३.८ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. पुढील काळातही गणेश भक्तांनी असाच प्रतिसाद द्यावा, अशी महापालिकेची अपेक्षा आहे.
हेही वाचा >>>नाशिक : युनेस्को पथक लवकरच साल्हेर किल्ल्यावर, जागतिक वारसा स्थळांत स्थान मिळण्यासाठी प्रशासनाची तयारी
विभागनिहाय मूर्ती संकलन
महापालिकेने राबविलेल्या मूर्ती दान उपक्रमात आतापर्यंत १७०७ मूर्तींचे संकलन करण्यात आले. यात पंचवटी विभागात ४११, नवीन नाशिक (सिडको) २४८, नाशिकरोड १३९, नाशिक पूर्व १५१, सातपूर ४७८, नाशिक पश्चिम २८० मूर्तींचा समावेश आहे. नागरिकांनी नदीत विसर्जन न करता मूर्ती दान करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.