नाशिक: पावसाने महिनाभरापासून ओढ दिल्याने धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये ऐन पावसाळय़ात टंचाईचे सावट गडद होत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३१ जुलैपर्यंत आरक्षण आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यातून काहीसा दिलासा मिळेल, अशी मनपाला आशा आहे. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय तूर्तास बाजूला ठेवला गेला आहे.

ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पावसाळय़ात १२ तालुक्यांतील ८४ गावे, ८३ वाडय़ांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या १५ हजार दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ २३ टक्के जलसाठा आहे.

जून संपण्याच्या मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेलानाही. तीसगाव, केळझर, माणिकपूंज ही धरणे कोरडीठाक झाली असून इतर सहा धरणांमध्ये जेमतेम पाणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये पाच टक्के जलसाठा कमी आहे. सध्या गंगापूर धरणात २६ टक्के, काश्यपी १६, गौतमी गोदावरी २५, आळंदी दोन, पालखेड ४३, करंजवण ११, वाघाड पाच, ओझरखेड २६, पुणेगाव ११, दारणा १४, भावली तीन, मुकणे ३०, वालदेवी १०, कडवा ८९, भोजापूर सहा, चणकापूर २०, हरणबारी २४, केळझर पाच, गिरणा ३३, पुनद १९ टक्के असा जलसाठा आहे.

पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस न झाल्यास गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागू शकते.

जूनच्या प्रारंभी महापालिकेने महिनाअखेपर्यंत पावसाचा अंदाज घेऊन पाणी कपातीचे संकेत दिले होते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर आणि दारणा धरणात पाणी आरक्षित आहे. सध्या गंगापूरमध्ये ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका जलसाठा आहे.

हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार पाऊस झाल्यास काहीअंशी दिलासा मिळेल, असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला वाटते. त्यामुळे पाणी कपातीचा विषय तूर्तास बाजुला ठेवला गेला असून त्यास या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

१२ तालुक्यांत अधिक झळ

ऐन पावसाळय़ात १२ तालुक्यांतील ८४ गावे आणि ८३ वाडय़ांना टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे.  प्रशासनाने ४२ गावे आणि ३० टँकरसाठी जिल्ह्यात ७२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. िदडोरी, निफाड आणि कळवण हे तीन तालुके वगळता सर्वत्र पाणीटंचाईचे चटके बसत आहे. टंचाई शाखेने दिलेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यात १६ गाव-वाडय़ांना, चांदवड १२, देवळा पाच, इगतपुरी १४, मालेगाव १९, नांदगाव १४, पेठ १३, सुरगाणा नऊ, सिन्नर एक, त्र्यंबकेश्वर आठ, येवला तालुक्यात सर्वाधिक ५३ गाव-वाडय़ांना टँकरने पाणी दिले जात आहे. टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाने बागलाणमध्ये १४, िदडोरी, देवळा प्रत्येकी सहा, इगतपुरी पाच, मालेगाव १२, पेठ १०, सुरगाणा चार, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि येवला तालुक्यात प्रत्येकी दोन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.