महापालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांची अखेरची सर्वसाधारण सभा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंहस्थ काळात सर्वानी एकत्रितपणे केलेले काम.. शहरातील विविध प्रश्नांची सोडवणूक.. अशा आठवणींना उजाळा देताना नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी मांडलेली प्रशिक्षणाची संकल्पना.. शहर विकासासाठी पुन्हा एकत्र येण्याच्या आणाभाका..  वाढदिवसानिमित्त महापौरांचे अभिष्टचिंतन.. अशा वेगळ्याच वातावरणात मंगळवारी विद्यमान सत्ताधाऱ्यांची अखेरची सर्वसाधारण सभा पार पडली. उपस्थितांपैकी बहुतांश नगरसेवक पराभूत असल्याने पुढील महासभेत ते दिसणार नाहीत. यामुळे सदस्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रदीर्घ काळ नगरसेवक भूषवत आमदार बनलेल्यांनी सभेला आवर्जून हजेरी लावली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या सभेत १८ नामकरणासह महापालिकेचे शहर अभियंता सुनील खुने यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या प्रस्तावाच्या इतिवृत्तासह मागील काही इतिवृत्तांना मंजुरी देण्यात आली.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विद्यमान सत्ताधारी मनसेने इतिवृत्तांना मंजुरी देण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सभा सदस्य नसल्याने विलंबाने सुरू झाली. जवळपास २५ नगरसेवक उपस्थित झाल्यावर सभेचे कामकाज सुरू झाले. महापालिका निवडणुकीत अनेक विद्यमान नगरसेवक पराभूत झाले. काही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही.

बोटावर मोजता येतील इतकेच पुन्हा निवडून आले. अशा सर्वानी शेवटच्या सभेला हजेरी लावून पालिकेतील कारकिर्दीचा आपल्या भाषणात आढावा घेतला. यावेळी नगरसेवक तथा आमदार बाळासाहेब सानप, आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह विक्रांत मते, कुणाल वाघ, प्रकाश लोंढे, राहुल दिवे आदी उपस्थित होते.

सानप यांनी पालिकेच्या सभागृहात २० वर्षे काम केल्याचा दाखला देऊन आता पुन्हा या सभागृहात येणार नसल्याचे सांगितले. कुंभमेळा यशस्वी करण्यात सर्वपक्षीय नगरसेवकांचा सिंहाचा वाटा आहे. सिंहस्थ कामांसाठी शासनाने पैसे दिले. परंतु, स्थानिक पातळीवर सर्वानी संयुक्तपणे तो यशस्वी होईल यासाठी धडपड केल्याचे प्रशस्तिपत्रक दिले. आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात साधुग्रामसाठी तपोवनातील जमीन आरक्षित करण्यात आल्याची आठवण त्यांनी कथन केली.

मते यांनी नवीन नगरसेवकांना पालिकेच्या कामकाजासाठी प्रथम प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखीत केली. नवीन नगरसेवकांना हे कामकाज समजून घेण्यात तीन ते चार वर्ष जातात. जेव्हा समजायला लागते, तेव्हा पाच वर्ष संपुष्टात येतात. त्यामुळे नव्याने महापालिकेत दाखल होणाऱ्या नगरसेवकांना विशेष वर्गाद्वारे प्रशिक्षण देण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कुणाल वाघ यांनी पाच वर्षांत केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. बहुतांश नगरसेवकांनी त्याबद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना काही सदस्यांची गाडी रुळावरून घसरली. सभागृहात महापौरांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडल्यानंतर जड अंत:करणाने सदस्यांनी सभागृहाचा निरोप घेतला.

याच सभेत शहर अभियंता सुनील खुने यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या आधीच्या सभेत मंजूर झालेल्या प्रस्तावाचे इतिवृत्तही मंजूर करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, या मुद्यावरून सत्ताधारी मनसेत दोन गट पडले. माजी आमदार नितीन भोसले यांनी खुने यांचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. खुने यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव पुन्हा राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन महासभेवर सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु, इतिवृत्त मंजूर करताना फारशी चर्चा झाली नाही. उलट या स्वेच्छानिवृत्तीला ज्यांनी विरोध केला होता, ते भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील हे अनुपस्थित होते. सभेत १८ नामकरणासह १२ इतिवृत्तांना मंजुरी दिली जात असल्याचे महापौरांनी जाहीर केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipal corporation elections 2017 nashik municipal corporation general body meeting
First published on: 01-03-2017 at 03:00 IST