नाशिक: ​मुंबई येथील बीकेसीतील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सोमवारी नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्ड्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रिंगिंग बेल’ वाजवून सूचीबद्ध करण्यात आले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारासाठी हरित महापालिका कर्जरोखे (ग्रीन म्युनिसिपल बाँण्ड्स) विक्रीतून २०० कोटींचे भांडवल उभारण्यात आले. हे बाँड्स खरेदीसाठी गुंतवणूकदारांचा इतका प्रतिसाद मिळाला की, प्रशासनही थक्क झाले. गोदावरी स्वच्छतेसाठी उभारलेल्या ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’चा विक्रम या बाँड्सनी मोडला आहे.

​एकाच वर्षात अवघ्या काही महिन्यांच्या अंतरात ‘क्लीन गोदावरी बाँड्स’ आणि ‘हरित महापालिका बाँड्सद्वारे’ प्रत्येकी २०० कोटी म्हणजे एकूण ४०० कोटींचे भांडवल उभारणारी नाशिक महापालिका ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नाशिक कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते.

पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. शासनाकडून निधी दिला जात असला तरी आपल्या हिश्याची रक्कम देण्यासाठी महापालिकेने कर्जरोख्यांच्या माध्यमातून भांडवल उभारणीचा स्वीकारलेला मार्ग कमालीचा यशस्वी ठरल्याचे अधोरेखित झाले.

​गेल्या डिसेंबरमध्ये नाशिक महानगरपालिकेने ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’मधून २०० कोटी रुपये उभारले होते. आता प्रत्येकी एक हजार रुपये दर्शनी मूल्य असलेल्या सूचीबद्ध, करपात्र हरित महापालिका कर्जरोख्यांची विक्री करण्यात आली. २५ फेब्रुवारी रोजी सुरू झालेली खरेदी २ मार्चला बंद झाली. या अंतर्गत वार्षिक ८.०५ टक्के दराने परतावा दिला जाईल. हे बाँड्स सूचीबद्ध करण्याच्या कार्यक्रमात मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी गुंतवणूकदारांनी दिलेल्या प्रतिसादाकडे लक्ष वेधले. मनपाच्या पहिल्या बाँड्सला मागणीपेक्षा ३.९ टक्के जास्त प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या बाँडने त्याचे विक्रम मोडीत काढले. या बाँडला मागणीपेक्षा ५.२ टक्के अधिक गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिल्याचे त्यांनी नमूद केले. म्हणजे महापालिकेला २०० कोटी रुपये उभारायचे होते, गुंतवणूकदारांच्या प्रतिसादाचे मूल्य १०४० कोटी इतके होते. अर्थात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर २०० कोटींच्या बाँड्सचे वाटप झाले आहे.

सामान्यांना संधी…

​पहिल्या क्लीन गोदावरी बॉण्डमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना सहभागी होता आले नव्हते. यावेळी ती कसर भरून निघाली. या बाँड्ससाठी संस्थात्मक गुंतवणूकदार ६० टक्के (१३० कोटी), बिगर संस्थात्मक २५ टक्के (५० कोटी) आणि सामान्य गुंतवणूकदारांना (१५ टक्के) ३० कोटी या प्रकारे गुंतवणूक झाली. अर्जदाराला किमान १ हजार रुपयांची (१० स्ट्रीप) गुंतवणूक करणे अभिप्रेत होते. या बाँड्सला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.