नाशिक : सततच्या पावसाने शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. खोदकाम केलेल्या ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने गुरुवारपासून एमएनजीएल, स्मार्ट सिटी कंपनीसह सर्वांना रस्ते खोदण्यास बंदी घातली आहे. १५ जूनपूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे पूर्णत्वास नेण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगितले जाते.
पावसाळ्यात खड्डेमय नाशिक हे चित्र नवीन नाही. दरवर्षी चकचकीत दिसणारे रस्ते खड्डेमय होतात. यंदा वळिवाच्या पावसाने पावसाळ्यापूर्वीच खड्डेमय रस्त्यांचा धोका उद्भवण्याची चिन्हे आहेत. शहरासह अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रमुख रस्त्यांची बिकट स्थिती आहे. खोदकाम आणि खड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
दोन, तीन महिन्यात एमएनजीएल, स्मार्ट सिटी कंपनी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल यंत्रणा आदी कामांसाठी खोदकाम झाले. पाऊस झाल्यावर या ठिकाणी रस्त्यावर येत आहे. त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने रस्त्यांची चाळणी होण्यास सुरुवात झाली. यापूर्वी मलमपट्टी केलेल्या रस्त्यांची वाट लागण्याच्या मार्गावर आहे. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत मोठी, अवजड वाहनांची वर्दळ असते. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात घडतात, असे उद्योजकांकडून सांगण्यात आले.
मागील वर्षी खड्ड्यांचा विषय बराच गाजला. अनेक आंदोलने झाली होती. जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणात सुमारे १० हजार खड्डे असल्याचे उघड झाले होते. मार्च अखेरपर्यंत खड्डे दुरुस्तीचे निर्देश दिले गेले होते. त्या अनुषंगाने कामे झाली. मात्र, काही प्रमाणात खड्डे बुजविले गेले नसल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. मागील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत ८१ कोटींच्या रस्ते दुरुस्तींच्या कामांना मान्यता दिली गेली. यात सुमारे ५० कोटींचा निधी खोदलेल्या रस्त्यांंच्या दुरुस्तीसाठी असल्याचे सांगितले जाते.
महिनाभरात दुरुस्तीचे उद्दिष्ट
शहरातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे सध्या पावसामुळे थांबली आहेत. जानेवारीतील सर्वेक्षणात निष्पन्न झालेल्या बहुसंख्य खड्ड्यांची दुरुस्ती यापूर्वीच करण्यात आली होती. परंतु, नंतरच्या काळात एमएनजीएल, स्मार्ट सिटीचे प्रकल्प, सीसीटीव्ही आणि सिग्नल यंत्रणेसाठी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले. शहरात १५ मेपासून खोदकामास पूर्णत: प्रतिबंध घालण्यात आला आहे. मान्सूनपूर्व रस्ते दुरुस्तीची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.- संजय अग्रवाल (शहर अभियंता. मनपा)