नाशिक – शहरातील गंगापूर रोड, दिंडोरी रोडसह इतरत्र फांद्या छाटलेली ५० ते १०० वर्षांची जुनी वारसा वटवृक्ष आहेत. एकतर ती तोडताच येत नाहीत. वडाच्या झाडाची पाने मोठी असतात. इतर झाडांच्या तुलनेत ती हवेतील कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. वटवृक्षांवरील फांद्या छाटताना टळटळीत उन्हाळ्यात महापालिकेने पक्ष्यांनाही बेघर केले. उन्हाळ्यात त्यांची सावली काढून घेतली.

न्यायालयाच्या निर्देशांकडे डोळेझाक केली. शिवाय वृक्षतोड आणि पुनर्रोपणास मंजुरी देताना घातलेल्या अटी- शर्तींचे स्वत: उल्लंघन केल्याकडे तज्ज्ञांकडून लक्ष वेधले जात आहे. कुंभमेळ्याच्या विविध कामांसाठी महापालिकेकडून वृक्षतोडीला अव्याहतपणे परवानगी दिली जात आहे. दिंडोरी रस्त्यावर १८ वृक्ष तोडण्यास तर, ४६ वड, पिंपळ आणि बेल या झाडांच्या पुनर्रोपणास परवानगी देताना वृक्ष अधिकाऱ्यांनी या वृक्षांवर पक्षी, पक्ष्यांची घरटी असल्यास ती वन्यजीव तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याची अट घातली.

गंगापूर रस्त्यावर ४४ झाडे आणि इतरत्र याच पद्धतीने विविध वृक्ष तोडण्यास परवानगी देताना या स्वरुपाच्या अटी व शर्ती टाकलेल्या आहेत. परंतु, त्यांचे स्वत: पालन केले नसल्याचा वृक्षप्रेमींचा आक्षेप आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार वारसा वृक्षाला हात लावता येत नाही. त्यांचे पुनर्रोपण करायचे असल्यास काही मानके निश्चित आहेत. कारण, शेकडो वर्ष जुन्या झाडाची भरपाई कधीही होऊ शकत नाही. शेकडो झाडे तोडताना आणि वटवृक्षांच्या फांद्या छाटताना या निकषांचे कितपत पालन झाले, असा प्रश्न जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ शितल गोळे-आडके यांनी उपस्थित केला.

वडाच्या झाडाच्या सरसकट सर्व फांद्या तोडण्याआधी पक्षी तज्ज्ञांसमवेत सर्वेक्षण केले होते का, झाडांवर किती घरटी होती, त्यांचे पुनर्वसन कुठे झाले, याची कुठलीही स्पष्टता केली गेली नाही. वडासह अन्य झाडांवर सुक्ष्म जीव. कीटक असतात. जैव विविधतेत त्यांचे महत्वाचे स्थान असून त्यांचे अस्तित्व संपुष्टात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

वारसा वटवृक्षाच्या पुनर्रोपणाचे विशिष्ट निकष आहेत. त्यासाठी स्वतंत्र नोटीस काढावी लागते. किती फांद्या तोडायला हव्यात, हे निश्चित आहे. याचा कुठलाही विचार न करता सरसकट संपूर्ण फांद्या तोडून केवळ झाडाचा बुंधा शिल्लक ठेवला गेला. वडाची आकाराने मोठी आणि दाट पाने सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून प्राणवायू देतात. कुठल्याही तज्ज्ञांना बरोबर न घेता अशाप्रकारे तोड कोणत्या नियमात बसते, असा संताप व्यक्त केला जातो. मनपाचा पुनर्रोपणाचा इतिहास चांगला नाही.

या प्राचीन वृक्षांना हटवून नाशिकची मोठी पर्यावरणीय हानी झाल्याचे गोळे-आडके यांनी नमूद केले. वृक्षप्रेमी देवांग जानी यांनी मनपा आदेश काढते आणि रातोरात वृक्षतोड करते, असा आरोप केला. तोडलेल्या वृक्षांची भरपाई कशी करणार, कुठे नवीन वृक्ष लागवड होणार, ती रोपे कशी जगविणार, याची कुठलीही माहिती दिली जात नाही. उन्हाळ्यात पक्ष्यांना सावलीची नितांत गरज असते.

याच काळात त्यांची घरटी उद्ध्वस्त करण्यात आली. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्देशांचे मनपाने पालन केले नसल्याचाआक्षेप त्यांनी नोंदविला. वृक्ष प्राधिकरण समितीने निर्णय झाल्यानंतर संकेत स्थळावर तो सार्वजनिक करायला हवा. २१ दिवसानंतर झाडे तोडता येतील. परंतु, सर्व नियम धाब्यावर बसविल्याचा पर्यावरणप्रेमींचा आक्षेप आहे.