नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, सुमारे दोन दशकांनंतर नाशिक महापालिकेत होणाऱ्या स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवेतील ११४ सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन संवर्गातील चालक आणि फायरमनची १८६ अशा ३०० रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेत राज्यभरातून तब्बल १९ हजार ५०० जण सहभागी होणार आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत २४ व २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आदी १३ शहरांतील २९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
नाशिकची लोकसंख्या वाढत असताना महापालिकेतील मनुष्यबळ कमी होत आहे. आस्थापनेवर ७०८२ पदे मंजूर आहेत. यातील तीन हजारहून अधिक पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाच्या निकषामुळे प्रदीर्घ काळ भरती करणे शक्य झाले नव्हते. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे महापालिकेला तांत्रिक मनुष्यबळाची निकड आहे. याचा कुंभमेळा कामांवर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेत शासनाने गेल्या वर्षी सरळसेवेने विविध विभागांतील १४० अभियंत्यांची पदे भरण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
मनपा आस्थापनेवरील अभियंता गट ‘क’ मधील ११४ पदांसाठी तसेच गट ‘क’ आणि ‘ड’ मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील १८६ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत. यामध्ये अभियांत्रिकी सेवेतील सहायक अभियंता (विद्युत) तीन, सहायक अभियंता (स्थापत्य) १५, सहायक अभियंता (यांत्रिकी) चार, कनिष्ठ अभियंता (विद्युत) सात, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४६, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) नऊ, कनिष्ठ अभियंता (वाहतूक) तीन, सहायक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २४ आणि सहायक कनिष्ठ अभियंता (विद्युत) तीन पदांचा समावेश आहे. तर आपत्ती व्यवस्थापन-अग्निशमन संवर्गातील अग्निशामक अर्थात फायरमनची १५० आणि चालक-यंत्रचालक, वाहनचालक (अग्निशमन) ३६ अशी एकूण पदे भरण्यात येणार आहेत.
जवळपास दोन दशकांनंतर महापालिकेत भरती होत आहे. टीसीएस कंपनीतर्फे ही प्रक्रिया राबविली जात असून लेखी परीक्षेत १९ हजार ५०० उमेदवार सहभागी होणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेत २४ व २५ फेब्रुवारीला लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा नाशिकसह सिन्नर, मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर व नांदेड अशा १३ शहरांमधील २९ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्रासंदर्भातील माहिती टीसीएस कंपनीकडून लवकरच संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे उपायुक्त साताळकर यांनी सांगितले.

