नाशिक – पेठ रोडवरील भक्तीधाम लगतच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला पटेल समाजातील महिलांनी कडाडून विरोध केला. यामुळे कारवाई न करताच पथकाला माघारी फिरावे लागले. कारवाईच्या वेळी परिसरात मोठा गोंधळ उडाला. ज्यांच्या दुकानावर कारवाई होणार होती, त्यांचे कुटुंबीय पूर्वी भाजपचे नगरसेवक होते. निवडणुकीच्या धामधुमीत पटेल समाज नाराज होईल, ही बाब व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या काही मंत्र्यांच्या कानी घातल्यानंतर हालचाली वेगवान झाल्या आणि रात्री बारा वाजता ही कारवाई तूर्तास थांबवण्याची वेळ महापालिकेवर आली.
या संदर्भात नाशिक जिल्हा धान्य किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी माहिती दिली. पेठ रोडवर भक्तीधामलगतच्या जागेत पटेल कांतीभाई वालजीभाई यांचे किराणा दुकान आहे. हे अतिक्रमित दुकान हटवावे, यासाठी संबंधित संस्थेकडून तक्रार करण्यात आली होती. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पालिकेने नोटिसा देऊनही संबंधित व्यावसायिकाने करारनामा किंवा तत्सम कागदपत्रे सादर केली नाहीत, तसेच समाधानकारक उत्तरेही दिली नाहीत.
हे दुकान हटवण्याचे आदेश निघाल्यानंतर गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुकानात किराणा माल असल्याने ते रिकामे करण्यासाठी काही वेळ दिला होता. व्यावसायिकाने सायंकाळपर्यंत मालमोटारीतून माल वाहून नेत दुकान रिकामे केले. परंतु, त्यानंतर महिलांना जमवून दुकानात ठिय्या मांडला. दुकानाजवळ जेसीबी येऊ नये म्हणून मालमोटार व टेम्पो आडवे लावले. पालिकेच्या पथकाने ही मालमोटार हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यास कडाडून विरोध झाला. यावेळी दोन्ही बाजूंनी मालमोटारीची अक्षरशः ओढाताण झाल्याचे संचेती यांनी सांगितले.
पेठ रोडवरील या दुकानासमोर रात्री बारा वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. व्यावसायिकाने समाजातील आणखी लोक जमा करण्याचा इशारा देऊन दबाव टाकल्याचे बोलले जात आहे. अतिक्रमण निर्मूलन कारवाईत अडथळे आणून गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार द्यायची की नाही, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तूर्तास स्थगित झालेली ही कारवाई लवकरच केली जाईल, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मंत्र्यांच्या मध्यस्थीने कारवाईला ब्रेक
पालिकेला खासगी जागेतील अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही, पथकाने आदेशही दाखवला नाही आणि रात्रीच्या वेळी कारवाई केली जात होती. ही कारवाई झाल्यास पटेल समाज नाराज होईल, ही बाब कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या निदर्शनास आणून दिली. मंत्र्यांनी या संवेदनशील प्रकरणात न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा करावी, असे सूचित केल्यानंतर पथकाने कारवाई थांबवली, असा दावा संचेती यांनी केला. महापालिका नियम धाब्यावर बसवून कारवाईच्या तयारीत होती, असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
