नाशिक – खड्डेमय नाशिकमुळे निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीवरून नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांची बैठक घेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी रस्त्यांची स्थिती, प्रलंबित दुरुस्ती कामे आणि उपलब्ध मनुष्यबळ आदींचा आढावा घेतला. रस्ते दुरुस्तीचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा, मनुष्यबळ आणि संसाधने तातडीने वाढविण्याचे निर्देश दिले.

मनपा प्रशासनाने जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल ११,६०९ खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. महापालिकेतील बैठकीत रस्ते दुरुस्तीची स्थिती महापौरांनी जाणून घेतली. यावेळी उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते. रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन वापराशी थेट संबंधित मूलभूत सुविधा आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते त्वरित वाहतुकीस योग्य स्थितीत आणण्यासाठी दररोज दिवस-रात्र अविरतपणे काम सुरू ठेवावे. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कामात कोणताही खंड पडू न देता दुरुस्तीची कामे सातत्याने सुरू ठेवावीत, असेही महापौरांनी निर्देशित केले.

कामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड सहन केली जाणार नाही. आवश्यक बांधकाम साहित्याच्या पुरवठ्याबाबत चिंता न करता जास्तीत जास्त क्षमता वापरून आणि उच्च दर्जाची गुणवत्ता राखून कामे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी साहित्य उपलब्धता, यंत्रसामग्री, वाहतूक आणि मनुष्यबळ वाढवून यांचे समन्वयित नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रस्त्यांची प्रभावी दुरुस्ती करून ते त्वरित वाहतुकीस योग्य करण्यासाठी जीएसबी, कोल्ड मिक्स, इंटरलॉकिंक पेव्हर ब्लॉक, कडक मुरूम आणि खडी यांचा वापर करावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामांची गुणवत्ता राखावी, असेही महापौर आडके यांनी सूचित केले.

रस्ते दुरुस्तीची स्थिती जाणून घेत बांधकाम विभागाला दररोज कामाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

कॉलनी रस्त्यांसाठी स्वतंत्र नियोजन

शहरातील कॉलनी रस्त्यांसाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या माध्यमातून कॉलनी रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण आणि दीर्घकालीन विकासासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे.

चार दिवसांत २,५६८ खड्ड्यांची दुरुस्ती

महापालिकेने युद्धपातळीवर मोहीम राबवत पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल ११,६०९ खड्डे बुजविले असून, त्यानंतर ३० जुलै ते दोन ऑगस्ट या चार दिवसांत आणखी २,५६८ खड्डे बुजविल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सर्व सहा विभागांमध्ये दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली असून मुख्य रस्ते, वाहतुकीची जास्त वर्दळ असलेले मार्ग आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना प्राधान्य देत विभागनिहाय पथके सातत्याने कार्यरत आहेत. पावसामुळे प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या स्थितीनुसार जीएसबी, मुरूम, कोल्डमिक्स तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या ‘मिलिंग मटेरियल’चा वापर केला जात आहे. या साहित्याच्या वापरामुळे पावसाळ्यातील खड्डे दुरुस्ती अधिक परिणामकारक होण्याची अपेक्षा असून, त्याचा वापर शहरातील विविध भागांत सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.