नाशिक : कुंभमेळा कामासाठी झालेली खोदकामे आणि अंबड औद्योगिक वसाहतीत खड्ड्यामुळे युवकाच्या झालेल्या मृत्युवरुन शहरात तीव्र रोष प्रगट होत असताना महापालिकेने तातडीने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांगल्या दर्जाचे साहित्य (जीएसबी) आणून प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जात आहे.
खड्डे बुजविण्यासाठी साहित्य पुरवठयाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांची मुख्य समस्या असून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. दुसरीकडे, अंबड येथे खड्ड्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
शहरात अपघातांच्या मालिकेमुळे महापालिकेविरोधात सामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खड्ड्यांमुळे अंबड येथे युवकाचा मृत्यू झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी महापालिकेत आंदोलने केली. समाजमाध्यमांतून पालिका प्रशासनाविरोधात वादळ उठले आहे. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आपली बाजू मांडली. मे महिन्यात खड्डे बुजवण्याची कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, पावसामुळे नवीन खड्डे तयार झाले. खड्डे दुरुस्तीसाठी साहित्य पुरवण्याच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत.
खड्डे बुजविण्याचे काम तीन, चार दिवसांपासून सुरू झाल्याचा दावा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केला. महापालिकेकडे साहित्याची कमरता होती. ती भरून काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांगल्या दर्जाचे साहित्य घेऊन मखमलाबाद रोड, गंगापूर रोड यांसारख्या प्रमुख रस्त्यांची कामे केली जात आहे. अंबड येथे झालेला अपघात कुंभमेळ्यासाठी हाती घेतलेल्या रस्त्यावर झालेला नसून तो एका वेगळ्या पोहच रस्त्यावर झाला. मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचाही समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठेकेदारांकडून दोन कोटींची नि:शुल्क कामे
पपया नर्सरी ते एक्स्लो पॉइंट आणि मखमलाबाद या जुन्या रस्त्यांची स्थिती आधीच खराब होती. त्यामुळे कुंभमेळ्यात या मार्गांच्या कॉक्रिटीकरणाचे काम हाती घेतले गेले. कॉक्रिटीकरणाला वेळ लागत असल्याने वाहतुकीसाठी रस्त्यावरील एका मार्गिकेवर वाळू, खडी आणि बारीक दगडाचे मिश्रण अर्थात जीएसबी टाकून रस्ता वापरण्यायोग्य केला जात असल्याचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले. रस्ते कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांना दीड कोटींचा दंड ठोठावला गेला. तसेच दोन कोटींहून अधिक किंमतीची रस्ते दुरुस्तीचे कामे ठेकेदाराकडून त्यांच्याच खर्चाने करून घेण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका कोणतेही अतिरिक्त पैसे देणार नाही, असे आयुक्त खत्री यांनी स्पष्ट केले.
दोषीवर कडक कारवाई -गिरीश महाजन
अंबड औद्योगिक वसाहत परिसरात खड्ड्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी करून जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. या संदर्भात मी घटनेची माहिती आयुक्त व महापौर यांच्याकडून घेतली आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या घटनेची चौकशी करण्याची सूचना केली असून जे जबाबदार असतील, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. मग ते ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील, त्याची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भामध्ये शनिवार नाशिक येथे बैठक होत असून कुंभमेळ्यातील विषयांसोबत अपघाताबाबत चर्चा केली जाणार आहे.
