नाशिक – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याची सुरू असलेली विविध कामे पंधरवड्यासाठी बंद करण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले. गणेश मंडपांसमोर खड्डे व तत्सम कुठल्याही अडचणी राहणार नाहीत, याची बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी. महापालिकेने गणेश मंडळांना मंडप, व्यासपीठ परवानगीसाठी द्यावे लागणारे ७५० रुपयांचे शुल्क माफ केले आहे.

महापालिकेच्यावतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत काही मंडळांचे पदाधिकारी वगळता बहुतांश मंडळे अनुपस्थित होती. प्रशासनाकडून योग्य प्रकारे बैठकीची माहिती दिली गेली नाही. दरवर्षीप्रमाणे पत्राद्वारे कळविण्यात आले नसल्याची तक्रार काहींनी केली. याची परिणती बैठकीत निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहण्यात झाली. अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत सहभागी होता आले नाही. आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये, ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांच्यासह उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्न व समस्यांकडे लक्ष वेधले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात हजारो कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये शहरातील २८ प्रमुख रस्त्यांचाही समावेश आहे. याशिवाय अन्य कामांसाठी खोदकाम होत आहे. या स्थितीमुळे गणेश मंडळांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काही मंडळांना मंडप उभारण्यासाठी जागा राहिली नाही. त्यामुळे त्यांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले. मंडपाचा आकारही लहान करावा लागला. खड्डेमय रस्ते व खोदकामाच्या तक्रारी लक्षात घेऊन महापौरांनी गणेशोत्सव आणि पारंपरिक मिरवणूक विनाअडथळा पार पडावी यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि गणेश मंडळांनी समन्वय साधावा, असे आवाहन केले. गणेश मंडळांच्या मंडपांसमोरील खड्डे बांधकाम विभागाने युद्धपातळीवर बुजवावेत. शहरात सुरू असलेली विविध कामे गणेशोत्सवाच्या काळात थांबवण्यात यावीत, असेही त्यांनी सूचित केले.

महावितरणला कानपिचक्या

सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे. १५ सप्टेंबरपासून आपण स्वतः आयुक्तांसमवेत रस्त्यावर उतरून पाहणी करणार असल्याचे महापौर आहेर यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी महावितरणला कानपिचक्या देत कामात सुसूत्रता आणावी आणि एक समन्वयक ठेवण्याची सूचना केली. मंडळांकडून मोफत वीजपुरवठ्याची मागणी होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मिरवणूक मार्गात महिलांसाठी शौचालय

गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाद्यपथकात मुली व महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. गुलालवाडी व्यायामशाळेच्या लेझीम पथकात शेकडो लहान मुले असतात. संबंधितांना पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाअभावी अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीदरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी शौचालयांची सोय महापालिकेतर्फे केली जाईल. व्यायामशाळा व इतर प्रमुख ठिकाणी पाणपोईची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असे महापौर हिमगौरी आहेर यांनी नमूद केले. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत विभागीय स्तरावर एकूण सहा लाखांहून अधिक रुपयांची पारितोषिके देण्याची घोषणा करण्यात आली.