आढावा घेण्यासाठी आज तातडीची बैठक
नाशिक : मनपाच्या शहर बस सेवेचे धोंगडे भिजत राहिल्याने र्निबध शिथील होऊनही नागरिकांसमोरील प्रवासाची समस्या कायम असल्यावर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिकेने बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. बस सेवेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
मनपा शहर बस सेवा सुरू करीत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने शहरातील सेवेतून अंग काढून घेतले. मनपाची बस सेवा अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे र्निबध शिथील होऊनही नागरिकांसमोरील प्रवाशांच्या समस्या कायम राहिल्या. मनपाच्या बससेवा सुरू करण्याची मागे तारीखही जाहीर झाली होती.
पण, करोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने तो विषय स्थगित ठेवला गेला. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेने बस सेवा सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. मनपाच्या बससेवेची बहुतांश तयारी आधीच झाली आहे. अलीकडेच प्रादेशिक परिवहन विभागाने मनपा हद्दीसह २० किलोमीटरच्या अंतरापर्यंत १४६ मार्गावर टप्पा वाहतुकीस परवानगी दिली आहे. तिकीट दरासही मान्यता मिळाली. या पाश्र्वभूमीवर, शुक्रवारी बस सेवेचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर कंपनीच्या बैठकीत बस सेवेची चाचणी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. महापालिकेने कंपनी स्थापन करून बस सेवा सुरू करण्याची तयारी गतवर्षीच केली आहे. करोनामुळे तो विषय लांबणीवर पडला होता. आता पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने शुक्रवारी कंपनीच्या पूर्व तयारीची आढावा बैठक बोलावली आहे. यावेळी बस सेवा सुरू करण्याबाबत चर्चा करून नंतर नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीची बैठक घेतली जाईल. या बैठकीत शहर बस सेवेची चाचणी कधी घेतली जाईल हे निश्चित होणार आहे.