नाशिक – जळगावमध्ये महायुतीत भाजपला मिळालेल्या सर्व ४६ जागा जिंकून १०० टक्के यश मिळवले. धुळे महापालिकेत पक्षाने ९० टक्के यश मिळवले. नाशिकमध्ये बहुमत मिळाले असले तरी विक्रमी आकड्याची अपेक्षा होती, तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करीत उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
नाशिक महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजपतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला. या विजयोत्सवात खुद्द मंत्री महाजन सहभागी झाले होते. उत्तर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकींची जबाबदारी त्यांच्याकडे होती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला कमालीचे महत्व प्राप्त झाले. त्र्यंबकचे नगराध्यक्षपद गमवावे लागल्याने भाजपने नाशिकची निवडणूक अधिक गांभिर्याने घेतली होती.
एबी अर्ज वाटपातील गोंधळ, पक्षांतर्गत असंतोष, अनेक प्रभागात बंडखोरी यामुळे भाजपचे संकटमोचक महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे पंधरवड्यापासून एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता त्यांना जळगावऐवजी नाशिकमध्ये तळ ठोकावा लागला होता. मतदानाच्या दिवशीही ते नाशिकमध्येच होते. निकालानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपला गतवेळच्या तुलनेत लक्षणीय यश मिळाले असले तरी आणखी जागा मिळवता आल्या असत्या याकडे लक्ष वेधले.
नाशिकमध्ये भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानत महाजन यांनी गेल्यावेळी ६६ नगरसेवक होते. यावेळी त्यात वाढ झाली. ८० प्लस होईल, असे वाटले. काही अडचणी आल्या. काही गोष्टी बोलता येण्यासारख्या नाहीत. ९० आणि १०० पर्यंतही सहज पोहचता आले असते. परंतु, १० ते १५ जागा हातच्या गेल्या्. नाशिकमध्ये विक्रमी आकड्याची अपेक्षा होती. परंतु, तिथपर्यंत पोहोचू शकलो नसल्याची नेहमीच खंत असेल. उत्तर महाराष्ट्रात भाजपला लक्षणीय यश मिळाले.
जळगावमध्ये आम्ही महायुतीत होतो. तिथे मिळालेल्या ४६ म्हणजे सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. १०० टक्के यशाचा हा महाराष्ट्रातील उच्चांक आहे. धुळ्यात सामाजिक गणित वेगळे आहे. तिथे ७४ पैकी एका समाजाचे १९ ते २० लोक निवडून येतात. राहिलेल्या ५५ पैकी ५१ जागा जिंकून भाजपने ९० टक्के यश मिळवले. नाशिकमध्ये बहुमत मिळाल्याचा आनंद असून आगामी कुंभमेळा यशस्वी करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी विजयाचे श्रेय मंत्री महाजन यांना दिले.
नाशिक महापालिका निवडणुकीचे संपूर्ण नियोजन मंत्री महाजन यांनी केले होते. जवळपास १५ दिवस नाशिकमध्येच तळ ठोकला. ऐनवेळी अनेक दिग्गजांना प्रवेश दिला गेला. पवननगर येथे त्यांनी स्वतंत्र सभा घेतली. परंतु, दीपक बडगुजर, कल्पना चुंबळे, कैलास चुंबळे, हितेश वाघ यासह काही माजी नगरसेवकांना पराभूत व्हावे लागले. भाजपला एकहाती सत्ता मिळाली, पण काही समीकरणे चुकली, हे महाजन यांच्या विधानातून समोर आले.
