नाशिक – महानगरपालिकेच्या मोठ्या रुग्णालयातील स्वच्छतेचे काम आस्थापनेवरील कर्मचारी नेमून केल्यास होणाऱ्या खर्चापेक्षा बाह्य यंत्रणेमार्फत ते कमी खर्चात होत असल्याचे लक्षात घेऊन महापालिकेने पाच मोठ्या रुग्णालयांच्या साफसफाईच्या कामाचे खाजगीकरण करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी वार्षिक तीन कोटी असा तीन वर्षांत एकूण नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आधीच्या ठरावातील अटीत फेरबदल करुन नव्या अटीनुसार सुधारीत ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत डॉ. झाकीर हुसेन (१०० खाटा ), पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय (५० खाटा ), सातपूर रुग्णालय (५० खाटा ), नवीन नाशिकमधील श्री स्वामी समर्थ रुग्णालय (५० खाटा) आँणि मेनरोडवरील जिजामाता रुग्णालय (२५ खाटा) या पाच मोठ्या रुग्णालयात साफसफाईसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी दिले होते. आरोग्य विभागाकडे चतुर्थश्रेणी पदावरील ७५ आया आणि ४६ कक्षसेवक (वॉर्डबॉय) इतके कर्मचारी आहेत. हे सर्व मोठी रुग्णालये, दवाखाने आणि प्रसूतीगृहे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपरोक्त पाच रुग्णालयात साफसफाईचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात येणार आहे.
साफसफाई दराच्या पडताळणीत ५० पैसे प्रति चौरस फूट दर आला. पाच रुग्णालयांचे क्षेत्रफळ एक लाख ६८ हजार ४९८ चौरस फूट आहे. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनसामग्रीचा विचार करता प्रतिवर्ष तीन कोटी असा तीन वर्षासाठी नऊ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. आस्थापनावर कर्मचारी नेमून होणाऱ्या खर्चापेक्षा हा खर्च कमी असल्याची खात्री आरोग्य विभागाने केली आहे. या संदर्भातील निविदेचा प्रस्ताव मार्च २०२५ मध्ये मंजूर झाला होता. त्यात अतिरिक्त आयुक्तांनी ठरावातील दोन अटीत काही बदल करण्याची सूचना केली. त्यानुसार अटीत बदल करून सुधारित ठराव मनपा सभेत मंजूर करण्यात आला.