नाशिक – नाशिक जिल्ह्यातील अनेक रस्ते आणि घाट खड्ड्यांमुळे, उखडले गेल्याने धोकादायक झाले आहेत. याविषयी संबंधितांकडे वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. हे रस्ते दुरुस्त होत नसल्याने अपघातांची संख्याही वाढली असून वाहनधारकही बेजार झाले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने नांदगाव तालुक्यात करण्यात आलेले अनोखे आंदोलन सध्या चर्चेचा विषय झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील काही रस्ते वेगवेगळ्या कामांसाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. अनेक वर्षांपासून त्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात असूनही काम पूर्णत्वास जात नाही. सोग्रस ते देवळा रस्त्यावरील घाटमार्ग अनेक वर्षांपासून आहे तसाच आहे. खड्डेमय झालेल्या या घाटमार्गातून वाहन चालविणे चालकांसाठी जणूकाही एक शिक्षाच मानली जात आहे. घाटाची दुरुस्ती केली जात असल्याचे कारण त्यासाठी दिले जात आहे.

असाच कायम चर्चेत राहणारा अजून एक घाट म्हणजे चांदेश्वरी घाट होय. या घाटात कायम अपघात होत असतात. चांदेश्वरी घाटमार्ग ठिकठिकाणी उखडला गेला आहे. खड्डे तर आहेतच. शिवाय या घाटात काही ठिकाणी अवघड वळणे आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने चांदेश्वरी घाटातील अवघड वळण आणि घाटाची तीव्रता कमी करणे तसेच प्रमुख जिल्हा मार्गाची झालेली बिकट अवस्था सार्वजनिक बांधकामाच्या वारंवार नजरेस आणून देण्यात आली आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी नसल्याचे कारण दिले जात असल्याने वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करणे भाग पडत आहे. यामुळे प्रहार शेतकरी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या वृत्तीच्या निषेधार्थ भीक मागो आंदोलन करून जमा झालेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला.
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील प्रमुख जिल्हा मार्ग ९१, ९२ यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी रस्ता शिल्लक राहिलेला नाही. बोलठाण ते रोहिले या पाच किलोमीटरच्या अंतरासाठी साधारण अर्धा तास लागतो. तशीच अवस्था बोलठाण ते कासारी रस्त्याची झाली आहे.

पिंपरखेड रस्ता, पिनाकेश्वर रस्ता, हे सर्व रस्ते खड्डेयुक्त झाले असून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाव्दारे मागण्या करूनही खड्डे बुजविले जात नाहीत. थातूरमातूर काम झाल्याचे दाखविण्यात येते. त्यामुळे बुजविलेले खड्डे दोन, तीन दिवसातच पुन्हा जैसे थे होत असतात. निधी नसल्याने कामे होत नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

त्यांच्या या उत्तराला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. या निषेधार्थ प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनातून जमा झालेली रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन ही रक्कम आपल्या वरिष्ठांपर्यंत आपण पोहोचवावी आणि आम्हाला नवीन नाही पण खड्डेमुक्त रस्ते द्यावेत, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली..यावेळी पोलीस, महसूल प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.लवकरच खड्डे भरण्याचे काम सुरू होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी देण्यात आले.