नाशिक – सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक -नांदुरी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. हे काम वेगात सुरु असून हे काम पूर्ण झाल्यावर नाशिकहून सप्तश्रृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. नांदुरी हे सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याचे गाव असल्याने रस्ता रुंदीकरणामुळे भाविकांना अधिक जलद जाता येणे शक्य होणार आहे. गुजरातमार्गे तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सप्तश्रृंग गडावर भाविक दर्शनासाठी येत असतानाही नाशिक-नांदुरी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु, आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने का होईना रस्ता रुंदीकरण होत असल्याने भाविकांमध्ये समाधान आहे.
नाशिक-नांदुरीमार्गे गुजरातलाही जाता येत असल्याने हा रस्ता महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणाराही आहे. असे असतानाही हा रस्ता कायमच दुर्लक्षित राहिला आहे. रस्ता अरुंद, खड्डे यामुळे या रस्त्यावर कायमच अपघात होत आले आहेत. सप्तश्रृंग गडावर जाणाऱ्या भाविकांकडूनही अनेक वेळा रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर, उशीरा का होईना, नाशिक-नांदुरी रस्त्याचे रुंदीकरण होत आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी तसेच, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तृतीय पक्ष गुणवत्ता नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांसह नाशिक-नांदुरी रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी केली. यावेळी रस्ता रुंदीकरणाच्या कामाची भौतिक प्रगती, बांधकामाची गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. तसेच युटिलिटी स्थलांतर, भूसंपादनाशी संबंधित बाबी, कामातील अडथळे आणि काम पूर्ण करण्याचे नियोजित वेळापत्रक याबाबतही माहिती घेण्यात आली.
आयुक्त शेखर सिंह यांनी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी करून कामाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित तांत्रिक निकष, गुणवत्ता मानके आणि लागू नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, यावर त्यांनी भर दिला. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक त्या गुणवत्ता चाचण्या नियमितपणे घेऊन त्याची नोंद ठेवावी तसेच तपासणीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने पूर्तता करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार, आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेने परस्पर समन्वयाने काम करावे, कामातील अडथळे तातडीने दूर करावेत आणि नियोजित वेळापत्रकानुसार कामाची प्रगती सुनिश्चित करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. कामाची भौतिक प्रगती, गुणवत्ता नियंत्रणाची कार्यवाही आणि अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधी यासह प्रकल्पाची अद्ययावत माहिती नियमितपणे उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते व वाहतूक पायाभूत सुविधांची कामे वेळेत आणि निर्धारित गुणवत्तेच्या निकषांनुसार पूर्ण करण्यावर कुंभमेळा प्राधिकरणाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
